danave and bagade | Sarkarnama

बागडे, दानवे यांच्या राजीनाम्यासाठी फुलंब्रीत आंदोलक पाण्याच्या टाकीवर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

औरंगाबाद : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मतदारसंघातील खासदार रावसाहेब दानवे यांनी मराठा आरक्षणावर तुमची भूमिका काय? हे रात्री साडेआठपर्यंत समक्ष येऊन स्पष्ट करावे. तसेच आरक्षणाला पाठिंबा दर्शवत पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी फुलंब्री येथे सात ते आठ आंदोलक शहरातील पाण्याच्या टाकीवर चढले आहेत. 

औरंगाबाद : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मतदारसंघातील खासदार रावसाहेब दानवे यांनी मराठा आरक्षणावर तुमची भूमिका काय? हे रात्री साडेआठपर्यंत समक्ष येऊन स्पष्ट करावे. तसेच आरक्षणाला पाठिंबा दर्शवत पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी फुलंब्री येथे सात ते आठ आंदोलक शहरातील पाण्याच्या टाकीवर चढले आहेत. 
साडेआठपर्यंत बागडे, दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट करून पदाचा राजीनामा दिला नाहीतर टाकीवरून उडी मारू असा इशारा या आंदोलकांनी दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आंदोलकांची समजुत काढून त्यांना सुखरूप टाकीवरून खाली उतरवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी तीन तासांपासून शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. 

मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत जिल्ह्यातील कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे वैजापूर येथील आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर या दोघांनी मंगळवारी (ता.25) आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे पाठवले होते. त्यानंतर राज्यभरात अनेक आमदार, उपनगराध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, सरपंच आदींनी मराठा आरक्षण मागणीच्या समर्थनार्थ राजीनामे देण्याचा सपाटा लावला आहे. या पार्श्‍वभूमीवर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री मतदारसंघात दुपारी चारच्या सुमारास सुधाकर शिंदे, नंदू मोटे, शैलेश बोरसे, प्रमोद गायकवाड, प्रभाकर भुसारे, काकासाहेब जाधव, ज्ञानेश्वर जाधव या तरुणांनी आंदोलन सुरू केले. 

शहरातील पाण्याच्या टाकीवर चढत या तरूणांनी रात्री साडेआठ वाजेपर्यंत मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे आणि आमदार हरिभाऊ बागडे यांनी येऊन मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. एवढेच नाही तर इतर लोकप्रतिनिधीं प्रमाणेच मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत पदाचा राजीनामा द्यावा नाहीतर आम्ही टाकीवरून उडी मारू अशी धमकी या आंदोलकांनी दिली. बळाचा वापर करत पोलीसांनी टाकीवर चढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही टाकीत उड्या मारू असा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे पोलीस आणि प्रशासन पेचात सापडले आहे. 

संबंधित लेख