Dalit Youth want new option | Sarkarnama

दलित-आंबेडकरी पक्षांमध्ये पुन्हा नवीन पर्यायाचा शोध

संजीव भागवत
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये रिपाइंसह एकाही आंबेडकरी पक्षाला एखादा नगरसेवक निवडून आणता आला नाही, यामुळे सर्वच पक्ष भाजपाच्या रणनितीपुढे निष्प्रभ ठरले असल्याने ही निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी राज्यात सध्या विचारमंथनावर विविध पक्ष, संघटना, विचारवंत आणि तरुणांच्या संघटनांनीही भर दिला आहे.

मुंबई - राज्यात मागील काही महिन्यांमध्ये झालेल्या महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दारूण अपयशाला सामोरे गेलेल्या दलित-आंबेडकरी पक्ष संघटनांसोबतच मतदारांमध्येही  मोठ्या प्रमाणात अस्वस्थता वाढली आहे. भाजपाने आपली वोट बँक पळवल्याने मुंबईसह पुणे, नागपूर आदी महत्वाच्या महापालिकांमध्येही एकाही जागेवर यश मिळवता आले नाही. यामुळे रिपाइंसह विविध तटा-गटात विस्तारलेल्या सर्वच पक्ष संघटनांकडून आता नवीन पर्याय शोधला जात आहे. त्यासाठी सर्वच पक्ष संघटनांचे विलिनीकरण करून एक ताकद राज्यात निर्माण करण्यासाठी विचारमंथनावर आता भर दिला जात आहे.

राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये रिपाइंसह एकाही आंबेडकरी पक्षाला एखादा नगरसेवक निवडून आणता आला नाही, यामुळे सर्वच पक्ष भाजपाच्या रणनितीपुढे निष्प्रभ ठरले असल्याने ही निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी राज्यात सध्या विचारमंथनावर विविध पक्ष, संघटना, विचारवंत आणि तरुणांच्या संघटनांनीही भर दिला आहे. फुले-आंबेडकरांच्या नावाने विविध गटा-तटांमध्ये विस्तारलेले पक्ष एकत्र यावेत, यासाठी मुंबई विद्यापीठात गेल्या काही दिवसांपूर्वीच झालेल्या तरुणांच्या बैठकीतही हा विषय गांभीर्याने चर्चिला होता.

या चर्चेत राज्यातील विशेषत: आंबेडकरी समाजाच्या मतदारांमध्ये निर्माण झालेली खदखद यावर तातडीने उपाय काढण्यासाठी सर्व पक्ष संघटनांनी एकत्र आले पाहिजे, यासाठी प्रमुख नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असा ठरावही संमत करण्यात आला होता. त्यामुळे या बैठकीनंतर सर्वच फुले-आंबेडकरी पक्ष आता विलिनीकरणाच्या बाजूने उभे राहण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपाइंचे प्रमुख खासदार रामदास आठवले यांनी नुकतेच सर्व आंबेडकरी पक्ष  हे गवई गटात सामील करावेत असे वक्तव्य केले होते, त्या वक्तव्याचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे, तर भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची यापुढे राज्यात कोणत्याही पक्षासोबत युती बनविण्याची मानसिकता नसल्याचे मत व्यक्त केले असल्याने राज्यातील दलित-आंबेडकरी पक्ष संघटनांच्या विलिनीकरणाच्या पर्यायावर अधिक भर दिला जाण्याची शक्यता फुले-आंबेडकरी चळवळतील ज्येष्ठ कार्यकर्ते विलास जाधव यांनी सरकारनामाशी बोलताना व्यक्त केली.

आंबेडकरी तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन एकच पर्याय राज्यात उभा करून भाजपाने खेचून नेलेली आपली वोटबँक परत कशी मिळवता येईल काय, यावर अधिक विचारमंथन केले जात असल्याचेही जाधव यांनी सांगितले. दरम्यान, याच नव्या पयार्यासाठी कोणत्याही पक्ष, संघटनांसोबतच युती न करता निवडणूक लढविणा-या बहुजन समाज पार्टीसोबतही बोलणी सुरू असून त्यासाठी चाचपणी केली जात असल्याचे जाधव यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.

संबंधित लेख