Dacoity at Shivsena Leaders House | Sarkarnama

येवल्यांचे शिवसेना नेते सुधीर जाधवांच्या मुलांना ओलिस ठेवून दरोडा 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 23 जुलै 2018

अनकाई (येवला) येथे पंचायत समितीचे माजी सभापती, शिवसेना नेते डॉ. सुधीर जाधव तसेच बाजार समितीच्या माजी सभापती शोभा जाधव यांच्या वस्तीवर दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लुटण्यात आला.

नाशिक : अनकाई (येवला) येथे पंचायत समितीचे माजी सभापती, शिवसेना नेते डॉ. सुधीर जाधव तसेच बाजार समितीच्या माजी सभापती शोभा जाधव यांच्या वस्तीवर दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लुटण्यात आला. यावेळी दरोडेखोरांनी लहान मुलांना ओलीस ठेवून घरातील सोने, रोकड काढून घेतली. या दरोड्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांसह विविध राजकीय नेत्यांनी डॉ. जाधव कुटुबीयांना धीर दिला. 

डॉ. जाधव यांनी येवला-मनमाड महामार्गालगत सुमारे 200 मीटर आत अनकाई शिवारात नुकताच बंगला बांधला. महिन्यापूर्वीच येथे राहण्यास गेले होते. सर्व कुटुंबीय झोपलेले असताना रविवारी पहाटे चारला अज्ञातांनी दरवाजा ठोठावत 'लहान मूल आजारी आहे, दरवाजा उघडा' असा आवाज दिला. आवाजाने हॉलमध्ये झोपलेली मुले जागी झाली. मुलगी "चोर-चोर' असा आवाज देत डॉ. जाधव यांना उठविण्यासाठी वरच्या मजल्यावर पळत गेली. तोपर्यंत चोरट्यांनी दरवाजा हातोड्याने तोडून घरात प्रवेश करून मुलाच्या गळ्याला चाकू लावला होता. समोरील दृश्‍य पाहून डॉ. जाधव यांनी ''मारहाण करू नका, जे पाहिजे ते घेऊन जा,'' असे सांगितले. 

शेवटी डॉ. जाधव यांच्या गळ्याला चाकू लावत रोख रकमेची मागणी केली. डॉ. जाधव यांनी रोख पैसे नसल्याचे सांगितले, मात्र याच वेळी घाबरलेल्या त्यांच्या आईने जवळील पैसे काढून दिले. विशेष म्हणजे आईचे दागिने ओरबाडू नका, काढून घ्या, मारू नका, असे डॉ. जाधव यांनी सांगितले. हा ऐवज लुटून पांढऱ्या रंगाच्या गाडीतून सहा जण निघून गेले. या घटनेने सबंध कुटुबीय धास्तावले होते. डॉ. जाधव शिवसेनेचे नेते असून आमदार नरेंद्र दराडे यांचे समर्थक आहेत. घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेनंतर दहाच मिनिटांत पोलिस पोलिस उपअधीक्षक हर्ष पोद्दार यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. विविध राजकीय नेत्यांनी जाधव कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. 

येथे क्लिक करा व सरकारनामा अॅप डाऊनलोड करा

संबंधित लेख