credit issue between ncp and bjp in koregaon taluka | Sarkarnama

पेयजल योजना कुणी आणली? साखर मात्र भाजपने वाटली!

राजेंद्र वाघ
बुधवार, 5 डिसेंबर 2018

त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी गावामध्ये ठिकठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले होते.

कोरेगाव (जि. सातारा) : राष्ट्रीय पेयजल योजनेची मंजुरी कोणी आणली यावरून कोरेगाव तालुक्यात श्रेयवाद रंगला आहे. देऊर (ता. कोरेगाव) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांत फ्लेक्सवॉर रंगले आहे.

निवडणुकीपूर्वीच कोरेगाव मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघण्यास सुरवात झाली आहे. विविध विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी पोस्टरबाजीचा आधार घेण्याची नवीनच प्रथा अलिकडच्या काळात सुरु झाली आहे. त्याचा प्रत्यय गेल्या वर्षभरापासून कोरेगाव मतदारसंघातील नागरीक घेत आहेत. देऊर गावामध्ये मंजूर झालेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या भूमिपूजनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसने मंगळवारी (ता. चार) सायंकाळी जाहीर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी निमंत्रण पत्रिकेसह आवश्‍यक ती तयारी संयोजकांनी आधीपासूनच सुरु केली होती. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी गावामध्ये ठिकठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले होते. कार्यक्रमाचा दिवस उजाडताच अचानक भारतीय जनता पक्षातर्फेही ठिकठिकाणी फ्लेक्स लावले.  परिणामी सकाळीच ग्रामस्थांमध्ये दोन राजकीय पक्षांमधील श्रेयवादाविषयीच्या चर्चेला सुरवात झाली. 

फ्लेक्सवॉरच्या चर्चेमध्ये ग्रामस्थ व्यस्त असतानाच भाजपचे नेते महेश शिंदे, राहुल कदम व कार्यकर्ते दाखल झाले आणि वाजत गाजत मिरवणूक सुरु झाली. यावेळी साखर वाटण्यात आली. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नियोजित कार्यक्रमाची तयारी सुरुच होती. सायंकाळी ठरलेल्या वेळेत आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परीषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आदींसह पदाधिकारी गावात दाखल झाले. सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह स्थानिक कार्यकर्त्यांनी सर्वांचे स्वागत केल्यानंतर वाजत गाजत मिरवणूक निघाली. त्यानंतर जाहीर कार्यक्रम झाला. 

संबंधित लेख