corporator ashwini kadam daily attending school | Sarkarnama

नगरसेविका असूनही रोजची शाळा न चुकविणाऱया अश्विनी कदम

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 8 मार्च 2018

मूळ शिक्षिका असलेल्या अश्विनीताई अपघातानेच राजकारणात आल्या. त्यातही सलग तिसऱ्यांदा नगरसेविका, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद ठघअशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी संधी मिळाली. पक्ष संघटनेतही त्या उत्साहाने काम करीत असतात. राजकीय वाटचालीत त्यांनी शाळा सोडली नाही. त्या आजही रोज शाळेत जातात आणि वेळेत वर्गात पोचतात. महिला दिनानिमित्त त्यांची ही ओळख

पुणे : पुणे महापालिकेच्या तब्बल पावणेसहा हजार कोटी रुपयांच्या बजेटची जबाबदारी सांभाळलेल्या आणि सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका आश्‍विनी कदम अजूनही शाळेत जातात.

महापालिकेत आक्रमक राहणाऱ्या आश्‍विनीताई शाळेची शिस्त मात्र अजिबात मोडत नाहीत. त्या रोज तेही वेळेतच वर्गात पोचतात आणि विद्यार्थ्यांना "धडे' देतात ! राजकारणात सक्रिय असूनही आवड म्हणून शाळा, विद्यार्थी आणि शैक्षणिक जगताशी आपला कनेक्ट ठेवण्याच्या उद्देशाने आश्‍विनीताई राजकारणाइतकेच वर्गात रमतात. करड्या शिस्तीच्या "बाई' आता विद्यार्थिंनी आणि सहकाऱ्यांच्या प्रिय शिक्षिका झाल्या आहेत. आठवी ते दहावीच्या वर्गांना त्या शिकवतात. रोज सकाळी साडे नऊ वाजता त्या शाळेत दाखल होतात. 

पती नितीन राजकारणात असले तरी अश्विनीताई सुरवातीला राजकारणापासूनच लांबच राहिल्या आणि स्वत:च्या शिक्षणाला प्राधान्य दिले. या काळात त्यांनी एम.ए. मराठी आणि त्यापाठोपाठ "आर्ट मास्टर'ची पदवी घेतली. त्यानंतर त्या सन 1999 मध्ये सेवा सदन संस्थेच्या (कै.) सौ. सुंदरबाई राठी हायस्कूलमध्ये (मुलींचे) सहशिक्षिका म्हणून रूजू झाल्या. मराठी आणि चित्रकला हे त्यांचे विषय आहेत.  

नितीन राजकारणात सक्रिय झाले आणि स्वत: महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली. पण, प्रभागातील आरक्षणामुळे महापालिकेच्या सन 2007 च्या निवडणुकीत आश्‍विनीताईंनाच निवडणूक रिंगणात उतरावे लागले. राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर त्यांनी मोठ्या मताधिक्‍क्‍याने निवडणूक जिंकली. त्यानंतर 2012 मध्ये कामाच्या बळावर त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या. याच काळात त्यांची राजकीय कारकीर्द उंचावत राहिली, महापालिकेच्या स्थायी समितीत त्यांना स्थान मिळाले. एवढचे नाही तर राष्ट्रवादीने त्यांना 2015 मध्ये त्यांना "स्थायी'च्या अध्यक्षपदाची संधी दिली. दरम्यान, महापालिकेचे सुमारे पावणेसहा हजार कोटी रुपयांचे बजेट त्यांनी मांडले. त्यात नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश केला. 

अश्विनीताईंनी या काळातही शाळेचा कनेट तुटू दिला नाही. अध्यक्षपदाच्या काळातील काही महिने वगळता त्या रोज शाळेत गेल्या आणि तासही घेत राहिल्या. विशेष म्हणजे, महापालिकेच्या सर्वसाधारण सभा, महिला बालकल्याण समितीच्या बैठका आणि पक्षाच्या आंदोलनातही आपला सहभाग दाखवतात.

 अश्विनीताई म्हणतात, ""मी मूळ शिक्षिका आहे. पण, राजकारणात आले. या दोन्ही क्षेत्रातील कामे निराळी असली, ती अधिक उत्साहाने पार पाडत असते. आपल्याकडील ज्ञान वाटल्याने ते वाढते, या भावनेतून विद्यार्थ्यांपुढे जात असते. शाळा हा माझ्या रोजच्या जीवनाचा भाग झाला असून, तेथील विद्यार्थिंनी, सहकारी शिक्षिक आणि इतर कर्मचारी माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. ''  

 
 

संबंधित लेख