माजी मंत्र्यांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याने बांधला बंगला !
मुंबई : माजी महसूलमंत्र्यांशी ओळख असल्याचे सांगत सरकारी कोट्यातून स्वस्त दरात जमीन देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष दगडू मांजरे (48) याला गोवंडी पोलिसांनी सोलापुरातून अटक केली.
अटक टाळण्यासाठी तो शेतात लपून राहत होता. पोलिसांनी ग्रामस्थांच्या वेशात पाळत ठेवून त्याच्या मुसक्या आवळल्या.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील रहिवासी असलेला संतोष मांजरे आणि वनमाला खरात यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी ओळख असल्याचे खुशलचंद पुणेकर यांना सांगितले होते.
बारामतीमधील सरकारी कोट्यातील सहा एकरचा भूखंड पाच लाख 36 हजार रुपयांत मिळवून देऊ; त्यासाठी सात लाख 15 हजार रुपये खर्च येईल, असे त्यांनी सांगितले होते. खरात हिने मांजरेच्या संगनमताने फसवणूक करून सव्वासहा लाख रुपये घेतले व जमीन न देता फसवणूक केली, अशी तक्रार पुणेकर यांनी 2017 मध्ये गोवंडी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
आरोपी संतोष मांजरे याच्याविरोधात सोलापूर येथील लोणंद पोलिस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी तो जामिनावर आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यातही त्याच्याविरोधात तक्रार अर्ज करण्यात आला आहे. खुशलचंद पुणेकर यांच्याकडून घेतलेल्या रकमेतून त्याने बंगला बांधल्याचा संशय असून, पोलिस तपास करत आहेत.