congress yelgar parishad abdul sattar | Sarkarnama

एल्गार यात्रेतून कॉंग्रेस करणार सरकारची पोलखोल : अब्दुल सत्तार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

औरंगाबाद ः एकीकडे कॉंग्रेसने केंद्रातील मोदी आणि राज्यातील भाजप-सेना सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा सुरू केली आहे. तर दुसरीकडे औरंगाबादेत या सरकारच्या कारभाराची पोलखोल करण्यासाठी जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने "एल्गार' यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत केली. 

सत्तार म्हणाले, की येत्या 24 सप्टेंबरपासून कॉंग्रेसची ही एल्गार यात्रा जिल्हा परिषद सर्कल व महापालिकेच्या प्रभागनिहाय काढण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकारने गेल्या साडेतीन-चार वर्षात जी खोटी आश्‍वासने दिली त्याची पोलखोल करण्यासाठी कॉंग्रेसच्या सर्व अंगीकृत संघटना, युवक कॉंग्रेस, पक्षाचे आजी-माजी आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत. कुठलाही गट-तट यात राहणार नाही. 

विभागीय आयुक्त कार्यालयासमोर असलेल्या स्व. राजीव गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून एल्गार यात्रेला सुरूवात होईल. समारोप राज्यात काढण्यात आलेली संघर्ष यात्रा जेव्हा औरंगाबादेत दाखल होईल तेव्हा केला जाणार आहे. 

या शिवाय लवकरच शहरातील सांस्कृतिक मंडळावर राज्यात नव्याने निवडूण आलेल्या युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार आणि एक लाख युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. यासाठी केंद्रातील कॉंग्रेसचे खासदार व तरुण नेते ज्योतीरादित्य शिंदे किंवा सचिन पायलट यांना आंमत्रित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. 
 
संबंधित लेख