Congress Workers Intstalled Board of Vilasrao Dheshmukh's Name | Sarkarnama

विलासराव देशमुख स्‍पर्धा परिक्षा केंद्राच्‍या नामफलकाची उभारणी  : सत्ताधाऱ्यांची टाळाटाळ, काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार

हरी तुगावकर
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

महापालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या स्‍पर्धा परीक्षा प्रशिक्षण  केंद्रास लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्‍याचा ठराव काँग्रेसच्या महापौर स्मिता खानापूरे यांच्या कार्यकाळात झालेल्या एका सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता.

लातूर : लातूर महापालिकेच्या वतीने श्री शिवछत्रपती वाचनालयाच्या च्या वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या स्‍पर्धा परीक्षा प्रक्षिक्षण मार्गदर्शन केंद्राला लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेत झाला होता. पण सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विलासरावांच्या नावाचा फलक बसविण्यास टाळाटाळ केली. हे पाहून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी  विलासरावांच्या स्मृति दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता. १३) रात्री या फलकाची उभारणी केली.

महापालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या या स्‍पर्धा परीक्षा प्रशिक्षण  केंद्रास लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्‍याचा ठराव काँग्रेसच्या महापौर स्मिता खानापूरे यांच्या कार्यकाळात झालेल्या एका सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. याचा प्रस्ताव तत्कालीन स्वीकृत नगरसेवक रवींद्र पाठक यांनी आणला होता. या केंद्राच्या उभारणीस नगरसेवक विक्रांत  गोजमगुंडे यांनी स्‍थायी समिती सभापती असताना या कामी पुढाकार घेतलेला होता. सदर नाम फलक उभारण्‍यास सत्‍ताधाऱ्यांच्या वतीने टाळाटाळ करण्‍यात  येत होती. 

याबाबत आठ दिवसांपूर्वी फलक उभारण्‍याची मागणी करण्‍यात आली होती. फलक उभारला न गेल्‍यास कार्यकर्ते स्‍वतः काम हाती घेतील असा इशारा देण्‍यात आला होता. तरीही सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विलासराव देशमुख यांच्‍या स्‍मृतीदिनाच्या पूर्व संध्‍येस काँग्रेस कार्यकर्त्‍यांनी स्‍वतःहून हा फलक उभारला. या फलक उभारणीसाठी नगरसेवक, कार्यकर्ते भिंतीवरही चढले होते.  यापुढे सत्‍ताधाऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्‍या कार्य काळातील कामे डावलण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यास अशा पद्धतीनेच कामे हाती घेण्‍यात येतील असा सूचक इशाराही यावेळी देण्‍यात आला.

या प्रसंगी नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, नगरसेवक आयुब मणियार, रघुनाथ मदने, सुरज राजे, यशपाल कांबळे, जफर नाना, कुणाल वागज, मुस्तकीम सय्यद, खाजमिण्या शेख, जयकुमार ढगे, जाफर सय्यद, विशाल चामे, बालाजी सोनटक्के,
अॅड.किशन शिंदे, कुणाल श्रंगारे, अजय वागदरे, अतिक शेख, अॅड.वसीम खोरीवाले, मुस्‍तकीम पटेल, सोहेल शेख, तौहीत खान, महेश ढोबळे, राम गोरड, करण कांबळे, ओमकार सोनवणे, प्रसाद शिगे उपस्थित होते.

संबंधित लेख