कर्नाटकातील पोटनिवडणुकीत कॉंग्रेस-जेडीएसचा विजयी चौकार, भाजपला झटका

कर्नाटकातील पोटनिवडणुकीत कॉंग्रेस-जेडीएसचा विजयी चौकार, भाजपला झटका


बंगळूर : कर्नाटकातील पोटनिवडणुकीत कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीला भरघोस यश मिळाले. अपेक्षेप्रमाणे आघाडीने लोकसभेच्या दोन जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ एकच जागा टिकवून ठेवता आली. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही मतदारसंघांत मात्र आघाडीचेच उमेदवार विजयी झाले. 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा (शिमोगा) व भाजपचे नेते श्रीरामलू (बळ्ळारी), तसेच मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (मंड्या) विधानसभा निवडणुकीत निवडून आल्याने लोकसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या होत्या. 

विधानसभा निवडणुकीत कुमारस्वामी दोन मतदारसंघांतून विजयी झाल्याने त्यांनी रामनगर विधानसभा मतदारसंघातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. जमखंडी विधानसभा मतदारसंघातील सिद्धू न्यामगौडा यांचे अपघाती निधन झाल्याने तीही जागा रिक्त होती. यासाठी लोकसभेच्या तीन व विधानसभेच्या दोन जागांसाठी तीन नोव्हेंबरला पोटनिवडणूक घेण्यात आली. त्याची मतमोजणी सोमवारी (ता. 6) झाली. निवडणुकीत "जेडीएस'ने आपल्या दोन्ही जागा टिकवून ठेवण्यात यश मिळविले. कॉंग्रेसने जमखंडी विधानसभेची जागा टिकवून ठेवली, तर बळ्ळारी लोकसभेची जागा भाजपकडून खेचून घेतली. भाजपने शिमोगा लोकसभा मतदारसंघाची जागा टिकवून ठेवली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोटनिवडणूक झाल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. विशेष म्हणजे पोटनिवडणुकीत प्रथमच कॉंग्रेस-जेडीएसने आघाडी करून भाजपच्या विरोधात निवडणूक लढविली. भाजपने सर्व पाच जागांवरही उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांना केवळ शिमोगा टिकवून ठेवता आले. शिमोगा लोकसभा मतदारसंघ हा येडियुरप्पा यांचा बालेकिल्ला असून, येथे त्यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र यांनी विजय मिळविला. रामनगर विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी यांनी एक लाख 9137 इतक्‍या मताधिक्‍क्‍याने विजय मिळविला. 2019 ची लोकसभा निवडणूक जेडीएस-कॉंग्रेस एकत्र लढविणार असल्याचेही मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज जाहीर केले. 

विजयी उमेदवार 
विधानसभा पोटनिवडणूक 
जमखंडी : आनंद न्यामगौडा (कॉंग्रेस) 
रामनगर : अनिता कुमारस्वामी (जेडीएस) 

लोकसभा पोटनिवडणूक 
बळ्ळारी : व्ही. एस. उग्रप्पा (कॉंग्रेस) 
शिमोगा : बी. वाय. राघवेंद्र (भाजप) 
मंड्या : एल. आर. शिवरामेगौड (जेडीएस) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com