हिंगोलीत शिवसेना - राष्ट्रवादीच्या मदतीला काँग्रेसचा हात

हिंगोलीत शिवसेना - राष्ट्रवादीच्या मदतीला काँग्रेसचा हात

हिंगोली - जिल्हा परिषदेच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी शिवसेना - राष्ट्रवादी समीकरणामध्ये काँग्रेसनेही मदतीचा ‘हात’ दिला आहे. जिल्हा परिषदेमध्ये आता वेगळेच सत्ता समीकरण पहावयास मिळणार आहे. दुसरीकडे तीन अपक्षांची मात्र, अडचणीची स्थिती झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे पंधरा, राष्ट्रवादीचे बारा, काँग्रेसचे बारा, भाजपचे दहा तर तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे शिवसेना -भाजप युती होऊन दोन अपक्ष मदत करतील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला बाजूला करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी हातमिळवणी केली.

जिल्हा परिषदेमध्येही हेच सूत्र कायम राहणार असल्याचे बोलले जाऊ लागले होते. त्यानुसार, शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कधी बैठकांमधून तर कधी दूरध्वनीवरून बोलणे सुरू झाले होते. अखेर शिवसेना - राष्ट्रवादी युती होऊन त्यांना काँग्रेसने पाठिंबा देण्याचे निश्‍चित झाले. त्यातून अपक्ष म्हणून विजयी झालेल्या सदस्यांचा परस्परच काटा निघणार होता.

या समीकरणानंतर मंगळवारी सकाळपासूनच सर्व पक्षांची गडबड सुरू झाली होती. त्यातच पालकमंत्री दिलीप कांबळे देखील हिंगोलीत दाखल झाल्यामुळे काही चमत्कार होणार का? याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, सभागृहात झालेल्या मतदानामध्ये अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या शिवरानी नरवाडे यांना ३९ मते मिळाली तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे अनिल पतंगे यांना ३९ मते मिळाली. या दोघांना काँग्रेसने मदतीचा ‘हात’ दिल्याचे स्पष्ट झाले. तर तीन अपक्षांनी तटस्थतेची भूमिका घेतली होती.

दरम्यान, काँग्रेसने दिलेल्या मदतीच्या हाताच्या बदल्यात त्यांना आता दोन सभापतिपदे दिली जाणार आहेत. त्यामध्ये समाज कल्याण सभापतीपद व शिक्षण सभापतीपद काँग्रेसकडे दिले जाणार असल्याचे विश्‍वसनीय गोटातून सांगण्यात आले आहे.

मात्र, या नवीन सत्ता समीकरणामुळे कोणाचा फायदा अन् कोणाचे नुकसान याचा अंदाज बांधणेही आता कठीण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिवसेना-राष्ट्रवादी अन् काँग्रेस एकत्र बसणार असल्याने भाजपला आता विरोधकाची भूमिका घ्यावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com