Congress stood first in Parbhani with 31 percent votes | Sarkarnama

परभणी महापालिका निवडणुकीत  ३१ टक्के मतांसह काँग्रेस नंबर वन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

परभणी महापालिका निवडणुक


३१ टक्के मतांसह काँग्रेस नंबर वन 

शिवसेना २०.०२ टक्के 
राष्ट्रवादी १९.३६ टक्के 
भाजप १६.४१ टक्के 
अन्य १०.७ टक्के 
नोटा २.५२ टक्के 

परभणी: महापालिकेच्या निवडणुकीत ३०.९९ टक्के मतांसह काँग्रेस पक्षाने ३१ जागा पटकावित अव्वल स्थान पटकाविले. मतांच्या टक्केवारीत दुसरे स्थान शिवसेनेने, तिसरे राष्ट्रवादीने तर चौथे भारतीय जनता पक्षाने प्राप्त केले. 

महापालिका निवडणुकीत दोन लाख १२ हजार ८८८ मतदारांपैकी ईव्हीएम व टपाली मतदानाच्या माध्यमातून एकूण एक लाख ३७ हजार ६१४ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ६४.६४ टक्के भरते. प्रत्यक्ष मतमोजनी झाल्यानंतर ‘ट्रू वोटर अॅप’च्या माध्यमातून ही आकडेवारी समोर आली आहे.  

महापालिका निवडणुकीत १६ प्रभागातील एकूण ६५ गटांत ४१८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी काँग्रेसने ६४, राष्ट्रवादीने ६३, शिवसेनेने ६२ तर भारतीय जनता पक्षाने ५८ उमेदवार दिले होते. छोट्या पक्षांसह अपक्षांची संख्या १७१ होती. 

मतांच्या टक्केवारीत काँग्रेस पक्ष अव्वल 
काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत सरासरी ३०.९९ टक्के मते प्राप्त केली. या पक्षाचे ३१ उमेदवार निवडून आले असून पक्ष अव्वल ठरला आहे. काही प्रभागांत या पक्षाच्या उमेदवारांनी झालेल्या मतदानाच्या ३१ ते ५४ टक्के मते प्राप्त करून चार किंवा तीन जागा जिंकल्यामुळे निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या देखील वाढली आहे.

 या पक्षाच्या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक सातमध्ये सरासरी ५४.२१ टक्के तर प्रभाग क्रमांक एकमध्ये ४९.१३ टक्के मते मिळविली आहेत. तर अनेक उमेदवारांनी झालेल्या मतदानाच्या ५० वा त्यापेक्षा अधिक मते प्राप्त केली आहेत. प्रभाग क्रमांक सातमध्ये या पक्षाच्या जाहेदा बेगम इब्राहीम यांनी ६०.७ टक्के, गुलमीरखान यांनी ६०.१ टक्के, सुनील देशमुख यांनी ५३.८५ टक्के मते प्राप्त केली. प्रभाग क्रमांक एकमध्ये गणेश देशमुख यांनी ६०.५५ टक्के तर श्रीमती राधिका गोमचाळे यांनी ५०.३६ टक्के मते प्राप्त केली. तर प्रभाग ११ मध्ये नाझनीन पठाण यांनी ५१.५५ टक्के मिळविली.

  काॅंग्रेसला १६ पैकी पाच प्रभागांत खातेही उघडता आले नाही. या पक्षाचे एका प्रभागात एक, तीन प्रभागांत प्रत्येकी दोन, चार प्रभागात प्रत्येकी तीन तर तीन प्रभागांत प्रत्येकी चार उमेदवार निवडून आहेत. 

मतांच्या टक्केवारीत शिवसेना दुसरी 

या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवसेनेला सरासरी २०.०२ टक्के मते जरी मिळालीअसली  तरी या मतांचे जागांमध्ये रूपांतर झाले नाही. या पक्षाचे केवळ सहा उमेदवार निवडून आले. या पक्षाचे १६ पैकी केवळ चार प्रभागात उमेदवार निडून आले. त्यामध्ये दोन प्रभागांत प्रत्येकी दोन तर अन्य दोन प्रभागांत प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला. उर्वरित १२ प्रभागात सेना खातेही उघडू शकली नाही.

अनेक प्रभागांत शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांशी काट्यांच्या लढती झाल्या. शिवसेनेने  त्या ठिकाणी २० ते २५ टक्क्यापर्यंत मते प्राप्त केली. अनेक प्रभागांत विजयी व पराभूत शिवसेना उमेदवारांच्या टक्केवारीत अल्पशी तफावत असल्याचे दिसून येते. शिवसेनेने प्रभाग १५ मध्ये सरासरी २८.६ टक्के, १० व १२ मध्ये २२.७२ टक्के, आठमध्ये २५.५५, नऊ मध्ये २३.०३, पाच मध्ये २९.८९, सहा मध्ये १९.८८ टक्के, तीनमध्ये २७.३७ टक्के मते मिळविली आहेत. 

राष्ट्रवादी टक्केवारीत कमी पण आकड्यात जास्त 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत सरासरी १६.४१ टक्के मते प्राप्त करून तिसरे स्थान मिळवले. परंतु आकड्याच्या गणिताट  पक्षाने दुसरा क्रमांक पटकाविला. या पक्षाचे १८ उमेदवार निवडून आले. तेही केवळ पाच प्रभागांतून .  उर्वरित ११ प्रभागांत पक्ष खातेही उघडू शकला नाही. या पक्षाचे प्रभाग २, ६, १० व १४ मधून प्रत्येकी चार तर प्रभाग १३ मधून दोन उमेदवार निवडून आले. या पक्षाने चार ते पाच प्रभागांत १६ ते २७ टक्क्यापर्यंत मते मिळविली परंतु उमेदवार मात्र विजयी झाले नाहीत. 
तर प्रभाग क्रमांक दोनमध्ये पक्षाच्या चांद सुभाना जाकेरखान यानी ५३.४९ टक्के, अलीखान यांनी ४९.५० टक्के मते प्राप्त केले. 

भाजपला १६.४१ टक्के मते 

भरतीय जनता पक्ष या निवडणुकीत प्रथमच मोठ्या ताकदीनिशी उतरला होता. या पक्षाने सरासरी १६.४१ टक्के मते प्राप्त केली. पक्षाचे आठ उमेदवार निवडून आले. त्यापैकी एकाच प्रभागातून पाच तर उर्वरित तीन प्रभागांतून तीन उमेदवार निवडून आले. अन्य १२ प्रभागांत पक्ष खाते उघडू शकला नाही. सहा प्रभागांत पक्षाने अतिशय प्रभावी कामगिरी केली. सरासरी २२ ते ३७ टक्क्यापर्यंत मते प्राप्त केली. प्रभाग १५ मध्ये तर पक्षाच्या उमेदवारांना सरासरी ४४.२० टक्के मते मिळाली. तर या प्रभागातून ५५.९८ टक्के मते घेऊन मंगला अनिल मुदगलकर या विजयी झाल्या. 

दोन अपक्षांनाही मारली बाजी 
या निवडणुकीत छोट्या पक्षांसह अपक्ष उमेदवारांची संख्या देखील मोठी होती. त्यांनी एकूण १०.७० टक्के मते प्राप्त केली असून १७१ पैकी दोन अपक्ष उमेदवार निवडून आले हे निवडणुकीचे वैशिष्ट्ये ठरले. चार पक्षाच्या झुंजीतून या दोन अपक्षांनी बाजी मारली हे विशेष. 

नोटाला २.५२ टक्के मते 
या निवडणुकीत यापैकी एकही उमेदवार पसंतीचा नसल्याचे २.५२ टक्के मतदारांनी दाखवून दिले. अनेक प्रभागांत तर विजयी व पराभूत उमेदवारातील अंतर हे नोटांच्या मतांपेक्षा कितीतरी कमी होते. तेथे नोटा हे बटन मतदारांनी दाबले नसते तर चित्र वेगळे राहिले असते, असेही बोलले जात होते. 

संबंधित लेख