Congress state president emerges stronger after change in party observer | Sarkarnama

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे आसन भक्कम

सरकारनामा
बुधवार, 11 जुलै 2018

आता निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे . या काळात संघटन अधिक मजबूत करून पक्षाचे बळ वाढवण्याची जबाबदारी अशोकरावांवर आहे . मात्र राज्यातील अन्य प्रभावी नेत्यांना सोबत घेऊनच त्यांना काम करावे लागेल . 

मुंबई :  महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश बदलल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बदलला जाईल काय? अशी चर्चा कॉंग्रेस वर्तुळात होती. कॉंग्रेसचे नवे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी अशोक चव्हाण यांचे काम उत्तम चालले असल्याची ग्वाही पहिल्याच दौऱ्यात दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
 

नारायण राणे कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाला उघड आव्हान देणारा मोठा नेता कॉंग्रेसमध्ये राहिला नव्हता. विदर्भातील काही असंतुष्ट कॉंग्रेस जनांनी अशोक चव्हाणांना उघड विरोध करून पाहिला. या संघर्षात अशोक चव्हाण सतीश चर्तुर्वेदी गटाला भारी पडले होते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पालघरमध्ये कॉंग्रेस पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला होता. राजेंद्र गावीत यांना उमेदवारी देताना खूप उशीर झाला. या विलंबाचा फायदा उठवत भाजपने कॉंग्रेसचा उमेदवारही पळविला आणि विजयही खेचून घेतला होता. पालघरमध्ये झालेल्या पराभवावरून अशोक चव्हाण यांची कोंडी करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. राजेंद्र गावितांना लवकर उमेदवारी देण्यात मोहन प्रकाश यांच्याकडून दिरंगाई झाली होती. ही बाब हायकंमाडच्या निदर्शनास चव्हाण गटाने आणून दिलेली होती.

परिणामी मोहन प्रकाश यांची गच्छंती झाली पण अशोक चव्हाण यांचे आसन भक्कम राहिले . अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी प्रदीर्घ काळ राज्यमंत्रीमंडळात विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. वादग्रस्त विधानांपासून ते दूर राहतात. राज्याच्या राजकारणाची त्यांना चांगली जाण आहे. निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांना प्रचार साहित्याची रसद पुरविण्याची जबाबदारी ते हिरीरीने पार पाडतात. त्यामुळे त्यांना पर्याय ठरेल असा तुल्यबळ नेता राज्याच्या कॉंग्रेसमध्ये नाही.
 

पृथ्वीराज चव्हाण हेदेखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. अशोक चव्हाणांच्याप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाण यांचे घराणेही गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रदीर्घ काळ हा केंद्र सरकारमध्ये दिल्लीमध्ये गेला असल्याने त्यांना राज्यभरात आपले नेटवर्क उभे करण्यास अजून काही काळ लागणार आहे. शिवाय ते महाराष्ट्रातच राहणार कि दिल्लीला जाणार या विषयी त्यांचे विरोधक अधूनमधून चर्चा होईल एवढी खबरदारी घेताना दिसतात. अशोक चव्हाणांना जेव्हढा  'वेळ' कार्यकर्त्यांसाठी खर्च  करतात तेवढा पृथ्वीराजबाबा वेळ कार्यकर्त्यांसाठी देत  नाहीत, अशीही काही कार्यकर्त्यांची तक्रार आहे.

नांदेड महापालिकेतील विजयानंतर अशोक चव्हाण यांचा प्रभाव आणि बळ वाढू लागले आहे. कॉंग्रेसच्या जिल्ह्या-जिल्ह्यातील संघटनांवर अशोक चव्हाणांनी पकड बसवली आहे. आता निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे . या काळात संघटन अधिक मजबूत करून पक्षाचे बळ वाढवण्याची जबाबदारी अशोकरावांवर आहे . मात्र राज्यातील अन्य प्रभावी नेत्यांना सोबत घेऊनच त्यांना काम करावे लागेल . कॉंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी अशोक चव्हाण यांचे स्थान भक्कम असून अन्य नेत्यांनी त्यांच्याशी समन्वय राखावा अशी भूमिका घेतली असल्याचे समजते.

संबंधित लेख