congress in satara | Sarkarnama

गोरे- पाटील वादावर कॉंग्रेसचे दोन चव्हाण कुठला तोडगा काढणार ?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

आमदार आनंदराव पाटील आणि आमदार जयकुमार गोरे हे दोघे ही पृथ्वीराज चव्हाण यांचे निष्ठावंत आहेत. त्यामुळे या दोघांच्या वादावर पडदा टाकण्यासाठी दोन चव्हाण कोणती रणनिती अवलंबणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सातारा : कॉंग्रेसच्या ब्लॉक कमिटी निवडीत विद्यमान आमदार व जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील हस्तक्षेप करत असल्याने त्यांच्यात आणि माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्यात वाद सुरू आहे. हा वाद प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यापर्यंत पोचला. आमदार गोरे यांनी याबाबत श्री. पाटील यांनी दिलेल्या सभासद याद्या आणि ब्लॉक कमिटी निवडी रद्द कराव्यात अशी मागणी श्री. चव्हाण यांच्याकडे केली. त्यामुळे कॉंग्रेस अंतर्गत वाद आता प्रदेशाध्यक्षपर्यंत पोचला आहे. 

सातारा जिल्हा कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरून आमदार व जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील आणि माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांची समजूत काढून दोघांना शांत करतील असे कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांना वाटत होते. पण दोघांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने दोघांतील शीतयुद्ध सुरूच राहिले आहे. 

आनंदराव पाटील यांना पुन्हा जिल्हाध्यक्ष करू नये अशी आमदार गोरे यांची मागणी आहे. निष्ठावंत कार्यकर्त्याला पद मिळावे अशी आमदार आनंदराव पाटील यांची अपेक्षा आहे. कॉंग्रेसच्या सभासद नोंदणीत आमदार आनंदराव पाटील यांनी त्यांच्या मर्जीतील लोकांचा समावेश केला आहे, तसेच ते ब्लॉक कमिटी निवडीत हस्तक्षेप करत असून त्यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांना तालुका व शहरचे अध्यक्ष करत असल्याचा आक्षेप आमदार गोरे यांचा आहे. 

मुळात सभासद नोंदणीत माण, खटाव आणि फलटण तालुक्‍यात आमदार गोरे व रणजितसिंह निंबाळकर यांनी फारसे लक्ष दिले नाही, त्यामुळे या तीन तालुक्‍यात सभासद नोंदणी झालेली नाही असे श्री. पाटील यांचे म्हणणे आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी या दोन आमदारांकडे दुर्लक्ष केल्याने आमदार जयकुमार गोरे यांनी काल याबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यामुळे दोन आमदारातील हा वाद आता प्रदेशाध्यक्ष पर्यंत पोचला आहे. आता या वादातून मार्ग काढण्यात अशोक चव्हाण यशस्वी होणार का या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आमदार आनंदराव पाटील आणि आमदार जयकुमार गोरे हे दोघे ही पृथ्वीराज चव्हाण यांचे निष्ठावंत आहेत. त्यामुळे या दोघांच्या वादावर पडदा टाकण्यासाठी दोन चव्हाण कोणती रणनिती अवलंबणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

संबंधित लेख