Congress Sachin Sawant's Criticism on CM | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांना खरे बोलण्याची सद्बुद्धी द्यावी अशी विठूरायाकडे प्रार्थना करू  : सचीन सावंत 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 जुलै 2018

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाच्या शासकीय महापूजेची परंपरा यावर्षी खंडीत झाली आहे याचे दुःख काँग्रेस पक्षाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या खोटारडेपणामुळेच ही वेळ त्यांच्यावर आली आहे. राज्यातील जनतेला मुख्यमंत्री आणि सरकारने वेळोवेळी दिलेली आश्वासने पाळली असती तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती - सचीन सावंत

मुंबई : राज्यातील जनतेला सातत्याने दिलेली खोटी आश्वासने आणि जुमलेबाजी मुख्यमंत्र्यांच्या अंगाशी आली आहे. जनतेची फसवणूक केल्यामुळेच आषाढी एकादशीला पंढरपूरला विठूरायाच्या शासकीय महापूजेची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा खंडित करून पळ काढण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.  

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले, "आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाच्या शासकीय महापूजेची परंपरा यावर्षी खंडीत झाली आहे याचे दुःख काँग्रेस पक्षाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या खोटारडेपणामुळेच ही वेळ त्यांच्यावर आली आहे. राज्यातील जनतेला मुख्यमंत्री आणि सरकारने वेळोवेळी दिलेली आश्वासने पाळली असती तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. समाजातील प्रत्येक वर्ग हा जुमलेबाजीमुळे त्रस्त असून त्याविरोधात आक्रोश व्यक्त करत आहे. मराठा आरक्षण असो, धनगर समाजाला आरक्षण असो किंवा मुस्लीमांना न्यायालयाने मान्य केलेले आरक्षण असो सरकारने आपला शब्द पाळला नाही त्यामुळे या समाजांमध्ये तीव्र संताप आहे.''

ते पुढे म्हणाले, ''यासोबतच शेतक-यांचे, शिक्षकांचे समाजातील इतर वर्गांचेही अनेक प्रश्न सरकारने सोडवले नाहीत. जनतेच्या संतापाचा सामना करावा लागू नये म्हणे म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या महापूजेला न जाण्याची पळवाट शोधली आहे, मात्र मुख्यमंत्र्यांना आरक्षणाच्या प्रश्नापासून पळ काढता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची आणि खरे बोलण्याची सद्बुध्दी विठ्ठलाने त्यांना द्यावी अशी प्रार्थना आषाढी एकादशीला विठूरायाकडे करू''. 

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख