Congress Rally against BJP in Nashik | Sarkarnama

भाजपच्या विरोधात काँग्रेसची मानवता पदयात्रा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर मालेगावच्या इन्सानियत बचाव संघर्ष समितीतर्फे मालेगाव ते नाशिक "मानवता वाचवा' पदयात्रेला सुरु झाली. मालेगावच्या एटीटी हायस्कूलपासून समितीचे अध्यक्ष आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला प्रारंभ झाला. तत्पूर्वी, झालेल्या चौकसभेत आमदार शेख यांनी भाजपच्या जातीयवादी भूमिकेवर कडाडून टीका केली.

नाशिक : 'भाजप जोमात आणि काँग्रेस कोमात' असा प्रचार सोशल मिडीयात होतो. मात्र मालेगावमध्ये मात्र काँग्रेसच्या आक्रमकते पुढे चाचपडणारी भाजप असे चित्र आहे. भाजपच्या गरीब व अल्पसंख्यांकाच्या धोरणांच्या विरोधात काँग्रेसतर्फे 'मानवता वाचवा' पदयात्रा काढण्यात आली आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद चर्चेचा विषय ठरला आहे.   

नुकत्याच झालेल्या मालेगाव महापालिका निवडणूकीत काँग्रेसने सर्व पक्षांच्या विरोधात एकाकी लढत देत चांगली कामगिरी केली होती. महापालिकेत काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख महापौर झाले. आता त्यांनी आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर लोकांत चर्चेत येण्य़ासाठी भाजपच्या धोरणाविरोधात पदयात्रा सुरु केली आहे. या पदयात्रेत थेट नागरिकांशी संपर्क साधून सरकारच्या धोरणाने होणारे नुकसान व अल्पसंख्यंक, गरीबांना येणा-या अडचणींचा पाढा वाचला जात आहे. त्यामुळे ही पदयात्रा राजकीय कार्यकर्त्यांत चर्चेचा विषय ठरली आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर मालेगावच्या इन्सानियत बचाव संघर्ष समितीतर्फे मालेगाव ते नाशिक "मानवता वाचवा' पदयात्रेला सुरु झाली. मालेगावच्या एटीटी हायस्कूलपासून समितीचे अध्यक्ष आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला प्रारंभ झाला. तत्पूर्वी, झालेल्या चौकसभेत आमदार शेख यांनी भाजपच्या जातीयवादी भूमिकेवर कडाडून टीका केली. महागाई गगनाला भिडली आहे. कामगार बेरोजगार होताहेत. उद्योग-व्यवसायांची स्थिती बिकट झाली आहे. देशाच्या मूळ समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी भावनिक मुद्दे काढून भाजप आपला स्वार्थ साधत आहे. देशात भाजपची सत्ता आल्यापासून दलित व मुस्लिमांवर प्राणघातक हल्ले होत आहेत. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात. शासनाचे लक्ष वेधले जावे, यासाठी पदयात्रा असल्याचे ते म्हणाले.

पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे भगवान आढाव यांनी 'देशातील अल्पसंख्याक समाज स्वतःला असुरक्षित समजत आहे. सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांच्या प्रकाराने समाज हवालदिल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बोलणे व प्रत्यक्ष कृतीत मोठा फरक आहे. कामगार, सामान्य नागरिक देशोधडीला लागला असून, उद्योगपती, व्यापाऱ्यांचे लांगुलचालन करण्यात सरकार धन्यता मानत आहे,'असे सांगून पदयात्रेला सक्रिय पाठींबा दिला.

पदयात्रेत सहभागी 70 व अन्य कार्यकर्त्यांनी भाग घेतला. रात्रीच्या
मुक्कामानंतर सकाळी यात्रा चांदवडकडे मार्गस्थ झाली. रात्री उशिरापर्यंत यात्रा चांदवड येथे मुक्कामी असेल. 19 ऑगस्टला पदयात्रा नाशिक येथे पोचेल. विविध नगरसेवक, नागरीक काँग्रेस व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

संबंधित लेख