गोरगरीब, शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस राहणार : राहुल गांधी

गोरगरीब, शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस राहणार  : राहुल गांधी

भाजपाचे सरकार उद्योगधार्जिणे असल्याची टीका

नांदेड : भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार उद्योजकांना हजारो कोटी रुपये द्यायला तयार आहे पण गोरगरिब, शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार, व्यापारी, बेरोजगार यांना मात्र वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे काँग्रेस गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यासाठी आपली शक्ती पणाला लावावी, असे आवाहन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी (ता. आठ) केले.

माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रदेश काँग्रेसच्या वतीने नांदेडला नवा मोंढा मैदानावर मराठवाडा विभागीय मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, नसीम खान, खासदार रजनीताई पाटील, राष्ट्रीय चिटणीस खासदार राजीव सातव, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, महापौर शैलजा स्वामी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सदस्य उपस्थित होते. महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर यांनी प्रास्ताविक केले तर स्थानिक पदाधिकारी व आमदार डी. पी. सावंत, अमिता चव्हाण, वसंत चव्हाण आदींनी स्वागत केले.

उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे व्यासपीठावर सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी आगमन झाले. त्यानंतर सव्वा बारा वाजता त्यांनी भाषण सुरू केले आणि बारा वाजून पन्नास मिनिटांनी त्यांनी भाषण संपविले. त्यांनी ३५ मिनिटांच्या भाषणात भाजप आणि मोदी सरकारवर टीका करत देश आणि राज्यातील अनेक मुद्दे मांडले.

भाषणात राहुल गांधी म्हणाले, ''काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारवर दबाब निर्माण केल्यामुळेच उत्तर प्रदेश त्याचबरोबर महाराष्ट्रातही भाजपाचे सरकार नमले आणि कर्जमाफी जाहीर करावी लागली. शेतकरी, शेतमजुरांवर कर्जमाफीसाठी रांगा लावण्याची वेळ आणून त्यांच्यावर अन्याय करत असताना दुसरीकडे मात्र उद्योगांना कोट्यावधी रुपयांची खैरात वाटण्यात येत आहे. नोटांबदी करून गोरगरिबांची फसवणूक आणि पिळवणुक केली. शेतकऱ्यांचा जमिनी लाटण्याचा प्रयत्न केला पण काँग्रेसने त्यांचा प्रस्ताव संसदेत हाणून पाडला. जीएसटी कायद्याची अंमलबजावणी टप्याटप्याने करण्याची मागणी केली असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे आता छोटे दुकानदार, व्यापारी यांच्यावर संपायची वेळ आली.''


युवकांना रोजगार देण्याची आणि मेक इन इंडियाची नुसती स्वप्ने दाखविली. मात्र, प्रत्यक्षात काहीच केले नसल्याचा आरोप करून श्री. गांधी म्हणाले ''जाती जातीमध्ये भांडणे लाऊन फक्त सत्ता काबीज करण्याचा उद्योग भाजपाने सुरू केला आहे. त्या उलट काँग्रेसने नेहमीच सर्वांना सोबत घेऊन काम केले असून काँग्रेसच्या विचारधारेला संपविता येणार नाही. संबंध देशभर भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही सर्वसामान्यांच्या न्याय व हक्कासाठी लढू, संघर्ष करू. गोरगरिब जनतेच्या, दलित, शोषित, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी ज्यांना ज्यांना या सरकारचा त्रास झाला आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम आगामी काळातही काँग्रेस करेल.''

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणात भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका केली. फसव्या घोषणांसोबत सहयोगी पक्षाच्या सदस्यांनाही फोडण्याचे काम भाजप सरकार करत असून लोकशाही आणि कायद्याची पायमल्ली होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com