Congress Pune Politics | Sarkarnama

चव्हाणसाहेब पुण्याची काँग्रेस वाचवा : निष्ठावंत कार्यकर्त्याचा टाहो

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 जुलै 2017

शहरातील एका निष्ठावान काँग्रेस नेत्याने थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना साद घातली आहे. पुण्याची काँग्रेस वाचवा, असा टाहो या नेत्याने प्रदेशाध्यक्षांसह राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांना लिहिलेल्या पत्रात फोडला आहे.

पुणे : ‘यह मकान सच्चे सेवकों का याने खिदमतगारों का बने’. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी पुण्याच्या काँग्रेस भवनाच्या उद्घाटनप्रसंगी काढले होते. पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या काँग्रेस भवनात एका शिलालेखावर हे वाक्य कोरलेले आहे. पण महात्मा गांधी यांच्या मनातल्या अपेक्षांच्या फार वेगळी स्थिती आजच्या पुणे काँग्रेसची झाली आहे. याच काँग्रेस भवनात बंडाचे निखारे फुलवले जाऊ लागले आहेत. निष्ठावंत नाराज आहेत.

याच नाराजीपोटी शहरातील एका निष्ठावान काँग्रेस नेत्याने थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना साद घातली आहे. पुण्याची काँग्रेस वाचवा, असा टाहो या नेत्याने प्रदेशाध्यक्षांसह राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांना लिहिलेल्या पत्रात फोडला आहे. हा पदाधिकारी पुणे शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता. राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान असताना या कार्यकर्त्याच्या कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. नंतर सोनिया गांधी सुद्धा आल्या होत्या. युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून शरद पवार साहेब, कै. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, कै. रामकृष्ण मोरे तसेच सुरेश कलमाडी यांच्या या पदाधिकाऱ्याने काम केले आहे.

सुमारे दोन महिन्यांपूर्वी लिहिलेले हे पत्र 'सरकारनामा'च्या हाती लागले आहे. या पत्राचा गोषवारा खास 'सरकारनामा'च्या वाचकांसाठी......

मा. अशोक चव्हाण साहेब,
अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस,
मुंबई

यांस.....

पुणे मनपा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. या निवडणुकीत उमेदवारांनी अर्ज करताना जमा केलेली रक्कम, चेकने आलेले पैसे, कुठे खर्ची झाले कसे झाले, याचा हिशेब मागण्याची ही वेळ नाही. तसेच तिकिट वाटपाची पद्धत एकाच वाॅर्डात दोन दोन एबी फाॅर्म, काहींना तिकिट मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक फाॅर्म न भरणे, पक्षाचा चार आण्याचा सभासद नसलेल्या व्यक्तींना अचानक दिले गेलेले तिकिट, नेत्यांच्या बाॅडी गार्ड, ड्रायव्हर यांचेकडे एबी फाॅर्म असणे, काँगेसचे नगरसेवक भाजपा व राष्ट्रवादीत कसे गेले? पंचतारांकित हाॅटेलमधून वितरित करण्यात आलेले एबी फाॅर्म, काँग्रेसच्या निम्म्याहून अधिक उमेदवारांची डिपाॅझिट जप्त झाली, याचे मुल्यमापन करण्याची वेळ राहिलेली नाही. परंतू, पुण्याचे खासदारकीचे उमेदवार डाॅ. कदम यांनी पहिल्या बैठकीत निर्णय केला होता की जो उमेदवाराची शिफारस करेल त्याने उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी. जर तो उमेदवार पराभूत झाला तर त्याचा दोष शिफारस करणाऱ्याला देण्यात येईल. तथापि तसे काही घडलेले दिसत नाही. प्रत्यक्ष शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्या प्रभागात दोन उमेदवार पराभूत झाले. परंतू, बिचाऱ्या अध्यक्षांना एकट्याला दोष देता येणार नाही. त्यांच्या मर्यादा आपण जाणतो. मतदारसंघात काम करणे वेगळे व शहराचे नेतृत्व करणे यात खूप फरक असतो.

काँग्रेसचे 161 पैकी केवळ 9 उमेदवार निवडून आले. निवडून आलेल्या उमेदवारांच्या प्रभागात राष्ट्रवादी सोबत आघाडी नसती तर केवळ तीन उमेदवार विजयी झाले असते, हे लक्षात घेण्यासारखे आहे. पण या दयनीय अवस्थेची कोणालाही ना खेद ना खंत. तिकिटामध्ये हिस्सा मागायला पुढे असणारे आता कुठे दिसत नाहीत.

देशात लोकसभा व महाराष्ट्रात विधानसभा लवकर होतील असे चिन्ह आहे. सन 2014 मध्ये डाॅ. विश्वजीत कदम हे पुण्यात पक्षाचे उमेदवार होते. पुण्यात त्यांचा अतिशय दारूण पराभव झाला. पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला. 1952 सालापासून झालेल्या 15 निवडणुकांपूर्वी 10 वेळा काँग्रेसने जिंकल्या. कै. काकासाहेब गाडगीळ ते सुरेश कलमाडी यांच्या पर्यंत काँग्रेस उमेदवार लाखो मतांनी विजयी झालेत. इथे विजयी होणाऱ्या काँग्रेसच्या खासदाराने देशाचे प्रतिनिधित्व केले. केंद्रीय मंत्रीमंडळात ते युनो मध्ये सुद्धा केले आहे.

पुणेकरांनी पुणे मतदारसंघात कधी नव्हे ते एवढ्या मतांनी डाॅ. विश्वजीत कदम यांना धुतकारले आहे, ते केवळ पुण्याबाहेरचे उमेदवार म्हणून नव्हे. तर त्याला अनेक कारणे आहेत. आदरणीय पतंगराव कदम साहेब यांची पुण्याशी नाळ जोडली आहे. गेली 50 वर्षे ते पुणेकरांच्या सुखदुःखात असतात. मागील चार मनपा निवडणुकीत ते निवड समितीचे प्रमुख होते. परंतू, एखादा अपवाद सोडला तर त्यांनी पुण्याच्या राजकारणात कधी हस्तक्षेप केला नाही. त्यांना याची कल्पना होती की, आपण पुण्यात संस्थेचा विस्तार करण्यासाठी पुण्यात आलो आहो.

युवक काँग्रेसमधील वडील बंधू म्हणून विश्वजीत कदमांना सल्ला राहिल, की त्यांनी सांगलीत आमदारकी लढवून मंत्री व्हावे. पुणेकरांना त्यांच्यात काँग्रेस कार्यकर्ता दिसत नाही. केवल दोन चार गुंड पोरे गोळा करुन लोकसभा जिंकता येणार नाही. फार तर इतरांचे पोष्टर फाडायला व पत्रक वाटायला ते उपयोगी येतात. सन 2014 मध्ये पुण्य़ाच्या विधानसभेच्या आठ जागांवर काँग्रेस पराभूत झाली आहे. येणाऱ्या विधानसभेत उमेदवार बदलणे गरजेचे आहे. अन्यथा पाच ऐवजी आठ उमेदवारांचे डिपाॅझिट जाण्याची शक्यता आहे. ज्यांना पक्षाने चारपाच वेळा आमदारकीची उमेदवारी दिली आहे, अशांना पुन्हा उमेदवारी देऊ नये. नेत्यांची हुजरेगिरी करणाऱ्यांना बाजूला ठेवा व खऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना संधी द्यावी.

पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचे (सांगली व पुणे) अधिकार एकाच व्यक्तीच्या व कुटुंबाच्या हातात दिल्याने पक्षाची वाताहात झाली आहे. केवळ पैशाकडे बघून सर्व सत्ता एकाच व्यक्तीच्या हातात केंद्रीत करत असाल तर ते राजीव गांधी व इंदिरा गांधी यांच्या तत्वा विरुद्ध आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण यांचे बेरजेचे राजकारण, कै. वसंतदादा पाटील यांचे संघटन कौशल्य, स्व. वसंतराव नाईक यांचे शेतकऱ्यांसाठी दिलेले योगदान, कै. शंकरराव चव्हाण यांचा शिस्तप्रिय कारभार व प्रशासनावरचा वचक तसेच कै. विलासराव देशमुख यांचे कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याची पद्धत कायम आमच्या स्मरणात आहे आणि पुढेही स्फूर्ती देत राहील.

चव्हाण साहेब,
छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवा, महात्मा फुले व लोकमान्य टिळक यांच्या अधिवासाने पुणे शहर पावन झाले आहे. इथल्या मातीत जन्माला आलेला कुठलाही नागरिक फार काळ अन्याय सहन करु शकत नाही. तो अन्यायाला वाचा फोडतो वा बंड करतो, हा माझा दोष नाही.

मी हे मनोगत आपणास व महाराष्ट्रातील सर्व नेते मंडळी, माझे प्रदेशमधील सहकारी यांना पाठवित आहे. कृपया आपण यावर वेळेत तोडगा काढावा व पक्ष वाचवावा ही विनंती.

आपला
xxxx

 

संबंधित लेख