congress politics in beed district | Sarkarnama

काँग्रेसचे ‘लक्ष्य’ परळीऐवजी बीड, केजकडे!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

मोदी - पाटलांचे राजकीय सख्य जिल्ह्याला माहित आहे.

बीड : काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत एकमेव परळीची जागा पक्षाकडे आहे. मागच्या निवडणुकीत स्वतंत्र लढताना उमेदवार शोधताना पक्षाच्या नाकी नऊ आले. मात्र, आता परळीकडे दुर्लक्ष करत स्थानिक नेत्यांनी बीड आणि केजची जागा पक्षाला सोडावी, अशी मागणी करण्यामागे नेमके इंगित काय, कोणाच्या सोयीसाठी आणि कोणाच्या अडचणीसाठी ही मागणी आहे, याचीची चर्चा सुरु झाली आहे. 

जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघापैकी परळी विधानसभा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याचा आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्याने या जागेचा प्रश्न उद॒भवला नाही. मात्र, मागच्या वर्षभरापासून दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे धनंजय मुंडे स्वत:साठी जागा सोडून घेतील असे मानले जात होते. मात्र, आता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीच या जागेवरुन लक्ष्य उठवून बीड आणि केजकडे वळविले आहे. 

गुरुवारच्या पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत जिल्हाध्यक्ष राजकीशो मोदी यांनी बीड आणि केज या दोन जागा पक्षाला सोडाव्यात अशी मागणी केली. त्यावर प्रदेशाध्यक्षांनी या दोनच काय आणखी एखादी जागा देऊ पण सर्वांनी एकत्र येत विजय मिळवावा असा सल्ला दिला. दरम्यान, परळी मतदार संघात पक्षाला मानणारा मतदार असला तरी येथील नेते तसे आपल्याच अंकित असल्याचे वातावरण राष्ट्रवादीने केले आहे. नगर पालिका आणि जिल्हा परिषदांमधील विजयानंतर राष्ट्रवादीच्या प्रतिक्रीया अशाच होत्या. त्यामुळे इथे काँग्रेस तग धरणार नाही म्हणून कि धनंजय मुंडे यांच्या सोयीसाठी या जागेकडे दुर्लक्ष केले जातेय हे कळण्यापलिकडे आहे. तर, राखीव असलेला हा मतदार संघ पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या कायम निमंत्रीत सदस्या आणि हिमाचलच्या पक्ष प्रभारी रजनी पाटील व पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजकीशोर मोदी यांचे होमपिच आहे. मात्र, राखीव असल्याने या दोघांनाही त्याचा लाभ नसताना ही जागा मागण्यामागे नेमके राजकारण काय, असा प्रश्न आहे. 

मागच्या निवडणुकीत रजनी पाटील यांच्या समर्थक डॉ. अंजली घाडगे यांनी पक्षाच्या उमेदवारीवर निवडणुक लढवत चांगली मते घेतली. मात्र, मोदींनी या जागेची मागणी डॉ. घाडगे यांच्यासाठी केली म्हणावं तर मोदी - पाटलांचे राजकीय सख्य जिल्ह्याला माहित आहे. त्यामुळे पाटलांमुळे मोदींनी हा शब्द टाकला नसून राष्ट्रवादीचे मुंदडा त्यांचे स्थानिक विरोधक आहेत. राष्ट्रवादीतून मुंदडांची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, अंबाजोगाई पालिकेतील राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी या जागेची काँग्रेससाठी मागणी करुन मुंदडांना अडचणीत आणता येते का असा मोदींचा प्रयत्न असू शकतो असे मानले जाते. तर, बीड ही देखील राष्ट्रवादीची जागा असून जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेले जयदत्त क्षीरसागर येथून उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, राष्ट्रवादी पक्षात त्यांचे विरोधक वाढल्याने ही जागा काँग्रेसला सोडून घेऊन क्षीरसागरांनाच पक्षाकडून उमेदवारी द्यायची नाही ना अशीही चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे.  

संबंधित लेख