Congress party Soniya Gandhi & Rajani Patil | Sarkarnama

.. आणि रजनी पाटलांना सोनिया गांधी यांच्याकडून मिळाला दिलासा आणि पैसेही ! 

सरकारनामा  
मंगळवार, 13 मार्च 2018

अशा प्रकाराने रजनी पाटील यांना राज्यसभेतील त्यांच्या अखेरच्या दिवशी सोनिया गांधी यांच्याकडून दिलासा मिळाला आणि पैसेही ! 

नवी दिल्ली  : "तुमचे काम आणि राज्यसभेतली कामगिरी लक्षात आहे. चिंता करू नका. तुमची काळजी मी घेणार आहे,'' अशा शब्दांत कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी मावळत्या राज्यसभा सदस्य रजनी पाटील यांना आज दिलासा दिला.

रजनी पाटील यांना या वेळी राज्यसभेची उमेदवारी मिळू शकली नाही. परंतु सोनिया गांधी यांनी त्यांना स्वतःबरोबर घरी नेऊन त्यांची समजूत काढली.शिवाय गडबडीत पर्स विसरलेल्या रजनी पाटलांना सोनिया गांधींनी परत पार्लमेंट हॉलमध्ये परत जाण्यासाठी टॅक्सीसाठी १२० रुपये देखील दिले . 

रजनी पाटील यांना वर्तमान राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून पुन्हा उमेदवारी मिळू शकली नाही. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीतून रजनी पाटील राज्यसभेवर आल्या होत्या. त्यामुळे त्यांनाच पुढे उमेदवारी देऊन सहा वर्षांची पूर्ण मुदत दिली जाईल अशी अपेक्षा होती.

परंतु ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी देण्यात आली. राज्यसभेतील रजनी पाटील यांची कामगिरी उत्कृष्ट होती. वेळोवेळी झालेल्या पाहणीत महाराष्ट्रातून त्या नेहमी प्रश्‍न विचारणे, विविध विषय उपस्थित करणे आणि प्रसंगी सरकारला धारेवर धरण्यातही त्यांनी चांगलीच आक्रमकता दाखविलेली होती. त्यामुळेच त्यांना कायम ठेवण्यात येईल अशी अपेक्षा होती.

आज काहीशा उदास अवस्थेत रजनी पाटील संसदेत बसलेल्या असताना बाहेर निघालेल्या सोनिया गांधी यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांना बोलावून घेतले . सोनिया गांधींनी बोलावले म्हणून रजनी पाटील यांची धावपळ उडाली . गडबडीत त्या आपली पर्स आणि मोबाईल फोन तेथेच विसरल्या . सोनिया गांधींनी रजनी पाटील यांना  स्वतःबरोबर गाडीत बसवून '10 जनपथ' येथील आपल्या घरी नेले. 

या वेळी झालेल्या संभाषणात रजनी पाटील यांनी त्यांना माझी  काही चूक झाली का? किंवा त्यांच्या कामगिरीत कुठे वैगुण्य किंवा त्रुटी होत्या का, असे प्रश्‍न सोनिया गांधी यांना विचारले . तेंव्हा सोनिया गांधी म्हणाल्या ,"तसे अजिबात काहीही  मनात नाही . तुमची राज्यसभेतील कामगिरी चोख होती.  उमेदवारी मिळाली नाही म्हणून निराश किंवा हताश होऊ नका. पक्षाचे आणि आपले वैयक्तिकरीत्याही तुमच्यावर लक्ष राहील आणि आपण स्वतः तुमची काळजी घेणार आहोत."

संभाषण झाल्यावर रजनी पाटील यांची काळजी घेण्याची वेळ सोनिया गांधींवर लगेचच आली . रजनी पाटलांची पर्स विसरली असल्याचे समजताच सोनिया गांधी यांनी त्याना  टॅक्सी साठी १२० रुपये दिले .  हे पैसे घेऊन त्या बाहेर पडल्या आणि बाहेर आल्यावर पक्षाच्या अन्य सहकार्यांनी त्यांना संसदेत कारमधून पोहोचवले .कुमारी शैलजा यांनी रजनी पाटील यांचा फोन व  पर्स सांभाळून ठेवली होती . अशा प्रकाराने रजनी पाटील यांना राज्यसभेतील त्यांच्या अखेरच्या दिवशी सोनिया गांधी यांच्याकडून दिलासा मिळाला आणि पैसेही ! 

संबंधित लेख