Congress NCP Shown Black Flags to Girish Mahajan | Sarkarnama

दुष्काळ दौऱ्यात सटाण्यात गिरीश महाजनांना कॉंग्रेस- राष्ट्रवादीकडून काळे झेंडे 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळपासून आपल्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरवात केली. यावेळी देवळा, उमराणे परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी करपलेली पिके, तळ गाठलेल्या विहीरींची माहिती घेतली. शेतकऱ्यांशी चर्चा केली. आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर यांसह भाजपचे विविध पदाधिकारी सहभागी झाले.

नाशिक : जिल्ह्यातील विविध भागात दुष्काळाचे तीव्र सावट आहे. त्यामुळे राजकारणही तापू लागले आहे. आज दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गेलेले जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात केलेल्या घोषणांनी काही वेळ गोंधळ उडाला. 

जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळपासून आपल्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरवात केली. यावेळी देवळा, उमराणे परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी करपलेली पिके, तळ गाठलेल्या विहीरींची माहिती घेतली. शेतकऱ्यांशी चर्चा केली. आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर यांसह भाजपचे विविध पदाधिकारी सहभागी झाले. या भागाची पाहणी केल्यानंतर सटाणा पंचायत समिती कार्यालयात बैठकीसाठी जात असतांना नगर परिषद कार्यालयासमोरील चौकात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अचानक काळे झेंडे घेऊन रस्ता अडवला. त्यामुळे पोलिसांचीही चांगलीच धावपळ उडाली. 

राज्य सरकार व भाजप मुर्दाबादच्या घोषणा देत असलेले काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते काकाजी सोनवणे, राहुल पाटील, राजेंद्र सोनवणे, नितीन सोनवणे, फिरोज शेख आदी पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बाजुला करुन ताफा मार्गस्थ केला. परिसरात तीव्र टंचाई आहे. प्यायला, शेतीला पाणी नाही. शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही पालकमंत्र्यांनी काहीही केलेले नाही. थेट कृती करण्याएैवजी ते पाहणी करीत असल्याने नागरिकांत नाराजी आहे. त्याची जाणीव करुन देण्यासाठी निषेध आंदोलन केल्याचे शहराध्यक्ष किशोर कदम यांनी सांगितले. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार दीपिका चव्हाण व माजी आमदार संजय चव्हाण यांनी पालकमंत्र्यांना दुष्काळाविषयीच्या उपाययोजनांचे निवेदन दिले. 

संबंधित लेख