Congress & NCP ready to obey alliance principle | Sarkarnama

दोन्ही काँग्रेस  अकोल्यासाठी आघाडीचा धर्म पाळणार

मनोज भिवगडे 
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे. ४० जागांवर सहमती झाली असून, चार जागाची अदलाबदल करण्यासाठी चर्चा सुरू आहे.

अकोला : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मित्र पक्षांसोबतच्या आघाडीचा धर्म अकोला मतदारसंघात पाळण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे. ४० जागांवर सहमती झाली असून, चार जागाची अदलाबदल करण्यासाठी चर्चा सुरू आहे. यात वऱ्हाडातील यवतमाळ-वाशीम या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. 

त्यासोबतच तीन जागा आघाडीतील मित्र पक्षांसाठी सोडण्याची तयारीही दोन्ही काँग्रेसने दर्शविली आहे. यात अकोला लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. अकोला मतदारसंघ काँग्रेस आहे. राज्यात भारिप बहुजन महासंघ प्रणित वंचित आघाडीला काँग्रेस आघाडीसोबत येण्यासाठी गळ घातली जात आहे. 

अद्याप याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत दोन्हीकडून देण्यात आले नाही. मात्र, मित्र पक्षासोबतचा आघाडी धर्म पाळण्यास काँग्रेस आणि राष्ट्रादी काँग्रेस नेत्यांनी सहमती दर्शविली आहे. काँग्रेसने यापूर्वीच ऍड .  प्रकाश आंबेडकर यांना आघाडीसोबत येण्याचे आवाहन केले आहे. आता दोन्ही काँग्रेसने अकोल्याची जागा भारिप-बमसं आघाडीत सामिल झाल्यास ऍड . प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडण्याची तयारी दर्शवून आघाडीचे संकेत दिले आहेत. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत भारिप-बमसंची आघाडी झाल्यास अकोल्यातील जागेवर ऍड . प्रकाश आंबेडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा मिळेल का, असा प्रश्‍न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात होता. मात्र, काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसनेही आघाडीचा धर्म पाळण्याचे संकेत दिल्याने आघाडीचा मोठा अडसर दूर होऊन काँग्रेस आघाडीत भारिप-बमसं सहभागी होण्याची शक्यता बळावली आहे.   

संबंधित लेख