Congress Leader Shantaram Potdukhe No More | Sarkarnama

इंदिरा गांधी यांच्या कठीण काळातील साथीदार शांताराम पोटदुखे यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 सप्टेंबर 2018

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. काँग्रेसच्या निष्ठावान नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. इंदिरा गांधी यांच्या पडत्या काळात विदर्भातील ज्या नेत्यांनी साथ दिली. त्यात शांताराम पोटदुखे यांचा समावेश होता. 

नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. काँग्रेसच्या निष्ठावान नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. इंदिरा गांधी यांच्या पडत्या काळात विदर्भातील ज्या नेत्यांनी साथ दिली. त्यात शांताराम पोटदुखे यांचा समावेश होता. 

ते मूळचे पत्रकार होते. चंद्रपूर येथून ते विविध भारती नावाचे वर्तमानपत्र प्रकाशित करीत होते. आणिबाणीनंतर काँग्रेसमधून अनेकजणांनी इंदिराजींची साथ सोडली. परंतु शांताराम पोटदुखे यांनी इंदिरा गांधी यांच्यामागे उभे राहिले. याचे फळ त्यांना लवकरच मिळाले. 1980 मध्ये लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांची चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून घोषणा केली. अशा रितीने शांताराम पोटदुखे यांचा राजकारणात प्रवेश झाला. अत्यंत प्रामाणिक व अजातशत्रू असलेल्या शांताराम पोटदुखे यांनी चारवेळा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. 

डॉ. मनमोहन सिंग यांच्या पहिल्या यूपीए सरकारमध्ये ते काही काळ अर्थराज्यमंत्री होते. त्यांनी चंद्रपूरमध्ये शिक्षण क्षेत्रातही भरीव कामगिरी केली. चंद्रपूर येथील प्रसिद्ध सरदार पटेल महाविद्यालयाचे ते विश्वस्त होते. महात्मा गांधी यांच्या विचाराचा प्रभाव असलेल्या शांताराम पोटदुखे यांच्यावर विरोधकांनाही एकही भ्रष्टाचाराचा आरोप करता आला नाही. गांधी विचारावर श्रद्धा व गांधी-नेहरू घराण्याची निष्ठा यावर ते आयुष्यात ढळले नाही.
 
 

संबंधित लेख