कॉंग्रेसचे कालिदास कोळंबकर शिवसेनेच्या प्रचारात 

कॉंग्रेसचे कालिदास कोळंबकर शिवसेनेच्या प्रचारात 

मुंबई : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून सुरू झालेला पक्षशिस्तीचे उल्लंघन करण्याचा शिरस्ता पक्षातील आमदारांनीही खुलेआमपणे सुरू ठेवला आहे.

कॉंग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांना जाहीर पाठिंबा देत त्यांचे पक्षकार्यालयात स्वागत केले. इतकेच नव्हे, तर निवडणुकीत राहुल शेवाळेंचा प्रचार करणार असल्याचेही उघडपणे मान्य केले.

नव्याने मुंबई कॉंग्रेसचा पदभार सांभाळणाऱ्या मिलिंद देवरा यांनी मात्र कोळंबकर यांच्याकडे दुर्लक्ष करत याबाबत अधिक माहिती घेऊन कारवाई करू, अशी मोघम प्रतिक्रिया दिली आहे. 

राज्यात कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या बेबंदशाहीला आवर घालण्यासही कोणी पुढे येताना दिसत नाही. विखे पाटील यांचा मुलगा सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट विखेंनी सुजय यांच्या प्रचाराची धुराही सांभाळली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत पक्षातील आमदारही पक्षाच्या विरोधात उघडपणे कारवाया करू लागले आहेत; मात्र कॉंग्रेसमध्ये त्यांना जाब विचारायलाही कोणी नाही. 

दक्षिण मध्य मुंबईतील आमदार कालिदास कोळंबकर यांनी उघडपणे राहुल शेवाळेंचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. राहुल शेवाळेंनी आज नायगाव येथील कोळंबकर यांच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर कोळंबकर यांनी कॉंग्रेसवर नाराज असल्यानेच युतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले.

इतकेच नव्हे, तर कोळंबकर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी मान्य केले. भाजपप्रवेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणे झाले असून, लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com