congress indira gandhi | Sarkarnama

कॉंग्रेसला इंदिराजींच्या जन्मशताब्दीचा विसर?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 ऑगस्ट 2017

नागपूर : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीचा नागपूर शहर कॉंग्रेसला विसर पडला आहे काय? असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. नागपूर शहरातील नेत्यांमधील गटबाजीने इंदिरा गांधी यांची जन्मशताब्दी साजरी करायलाही नागपूर कॉंग्रेसला मुहूर्त मिळालेला नाही. 

नागपूर : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीचा नागपूर शहर कॉंग्रेसला विसर पडला आहे काय? असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. नागपूर शहरातील नेत्यांमधील गटबाजीने इंदिरा गांधी यांची जन्मशताब्दी साजरी करायलाही नागपूर कॉंग्रेसला मुहूर्त मिळालेला नाही. 

हे वर्ष इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीचे आहे. कॉंग्रेस पक्षातर्फे देशात विविध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश देशातील सर्व जिल्हा कॉंग्रेस समित्यांना दिलेले आहेत. तसा ठरावही कॉंग्रेस कार्यकारी समितीने केला आहे. येत्या 19 नोव्हेंबरला इंदिराजींच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होईल. इंदिराजींचे शताब्दी वर्ष संपायला तीन महिनेही उरलेले नसताना नागपूर कॉंग्रेसने अद्यापही एकही कार्यक्रम आयोजित करून आदरांजली वाहिलेली नाही. 

नागपूर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी-नितीन राऊत यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादामध्ये इंदिराजींच्या शताब्दीचा कार्यक्रमालाही सुरूंग लागलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या निवडणुकीपासून मुत्तेमवार गट व चतुर्वेदी गटांमध्ये मतभेद उफाळून आलेले आहेत. महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसची वाताहात झाल्यानंतर विरोधी पक्षनेतापदावरून दोन्ही गटामध्ये सुरू झालेला वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. यामुळे दोन्ही गट एकत्र येऊन इंदिरा गांधी यांची शताब्दी साजरी करण्याचे कोणतेही चिन्हे दिसत नाहीत. 

येत्या ऑक्‍टोबर महिन्यात कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकाही होणार आहेत. या निवडणुकांमध्ये सध्या कॉंग्रेसचे कार्यकर्ते गुंतलेले आहेत. त्यामुळे येत्या नोव्हेंबरपर्यंत इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम होण्याची शक्‍यता धूसर झालेली आहे. 

संबंधित लेख