congress-delegation-meets-governor-fast-implementation-reservations- | Sarkarnama

तात्काळ आरक्षणासाठी कॉंग्रेस शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल व मागासवर्ग आयोगाची भेट

संजय मिस्कीन
सोमवार, 30 जुलै 2018

मराठा, मुस्लीम, धनगर, महादेव कोळी, लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने  राज्यपालांनी  यासंदर्भात हस्तक्षेप करून राज्य सरकारला निर्णय घेण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी केली.

मुंबई : मराठा, मुस्लीम, धनगर, महादेव कोळी आणि लिंगायत समाजाच्या  आरक्षणाच्या मागणीसंदर्भात कॉंग्रेस आमदारांच्या भावना तीव्र असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. सरकारने जनतेच्या संयमाची अधिक परीक्षा न पाहता आणि सध्याच्या इतर प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासह इतर आरक्षणासंदर्भातील निर्णय तातडीने जाहीर करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

मराठा, मुस्लीम, धनगर व इतर समाजांच्या आरक्षणाबाबत विधीमंडळ कॉंग्रेस पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी दुपारी 12 वाजता विधानभवनातील कॉंग्रेस विधीमंडळ पक्ष कार्यालयात सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. बैठकीला खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा. जोगेंद्र कवाडे, नसीम खान, बसवराज पाटील मुरूमकर आदी नेते प्रामुख्याने उपस्थित होते.

या बैठकीमध्ये आरक्षणाच्या विविध मागण्यांच्या सद्यस्थितीवर विचारविनिमय झाला. याप्रसंगी आमदारांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. आरक्षणावरून संपूर्ण महाराष्ट्रात असंतोषाचा वणवा पेटला असताना ठोस निर्णय किंवा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात सरकार साफ अपयशी ठरल्याने मराठा समाजासह इतरही समाजांचा उद्रेक झाल्याचे अनेक आमदारांनी सांगितले. यासंदर्भात जनतेची बाजू मांडण्यासाठी राज्यपालांची तसेच राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

दरम्यान, कॉंग्रेस शिष्टमंडळाने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. याप्रसंगी शिष्टमंडळाने सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढाच राज्यपालांपुढे वाचला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात सर्वत्र आणि दररोज सुरू असलेल्या आंदोलनांची माहिती दिली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील कानडगाव येथील 27 वर्षीय काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली आणि प्रमोद पाटील यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्मत्याग केला. राज्यात अनेक बळी गेल्यानंतरही अद्याप या मुद्यावर सरकारचे धोरण उदासीनच असल्याचे त्यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी न्यायालयाच्या नावाखाली सरकार जाणीवपूर्वक दिरंगाई करीत असल्याचे सांगितले.त्यानंतर सायंकाळी 5 वाजता कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एम.जी. गायकवाड यांची भेट घेऊन मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल लवकरात लवकर सादर करण्याची विनंती केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख