Congress CWS Vidarbha Appointments | Sarkarnama

काँग्रेसमध्ये 'दरबारी' राजकारणाला संधी?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 जुलै 2018

राहुल गांधी यांनी पक्षाची सूत्रे हातात घेतल्यानंतर बदल होतील, हे अपेक्षित होते. परंतु फारसे आमुलाग्र बदल मात्र झालेले नसल्याचे नव्या कार्यकारी समितीने स्पष्ट केले आहे.

नागपूर : काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यकारिणीमुळे नागपुरात मात्र चांगलाच भूकंप झाला आहे. गेल्या वर्षांपासून काँग्रेस कार्यकारिणीत असलेले विलास मुत्तेमवार यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. लोकांमध्ये फारसा प्रभाव नसलेल्या व कायम दिल्लीत 'दरबारी' राजकारण करणाऱ्या माजी मंत्री मुकुल वासनिक व माजी खासदार अविनाश पांडे यांना थेट कार्यकारिणीत संधी मिळाली आहे.

राहुल गांधी यांनी पक्षाची सूत्रे हातात घेतल्यानंतर बदल होतील, हे अपेक्षित होते. परंतु फारसे आमुलाग्र बदल मात्र झालेले नसल्याचे नव्या कार्यकारी समितीने स्पष्ट केले आहे. विदर्भातून माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक व माजी खासदार अविनाश पांडे यांना काँग्रेस कार्यकारिणी समितीमध्ये (सीडब्ल्यूसी) संधी मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सीडब्ल्यूसीमध्ये असलेल्या विलास मुत्तेमवार यांना काँग्रेसच्या सर्वोच्च समितीमध्ये स्थान मिळू शकले नाही. 

मुकुल वासनिक व अविनाश पांडे हे दोन्ही नेते स्थानिक राजकारणात सक्रिय राहत नाहीत. ते कायम दिल्लीत ठाण मांडून असतात. अविनाश पांडे यांच्याकडे राजस्थान राज्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी आहे तर वासनिक यांच्याकडेही इतर काही राज्यांच्या प्रभारीपदाचा कार्यभार आहे. दिल्लीतील "दरबारी' राजकारणात हे दोन्ही नेते पारंगत झाले आहेत. या दिल्लीतील संबंधांचा फायदा घेऊन ते इतरांचा 'गेम' करतात, अशी भावना आता व्यक्त होऊ लागली आहे. काँग्रेस कार्यकारिणीत राहिलेले विलास मुत्तेमवार यांना या कार्यकारिणीत संधी मिळू शकली नाही. अविनाश पांडे यांनी नागपुरातून 1985 मध्ये विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढविलेली नाही. वासनिक 1985 पासून निवडणूक लढवित आहेत. परंतु, ते सलग दोनवेळा कधीही निवडून आले नाहीत. 

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख