Congress criticized state government | Sarkarnama

सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा : वडेट्टीवार 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 जून 2017

शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामागे विरोधकांची फूस असल्याचे वक्तव्य करीत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी मुख्यमंत्री असंवेदनशील वक्तव्य करीत असल्याने सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानसभेतील कॉंग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 

नागपूर : शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामागे विरोधकांची फूस असल्याचे वक्तव्य करीत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी मुख्यमंत्री असंवेदनशील वक्तव्य करीत असल्याने सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानसभेतील कॉंग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 

गेल्या 1 जूनपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. शेतकरी भाजपाला व दूध रस्त्यांवर फेकून सरकारच्या धोरणांचा निषेध करीत आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षांचा पाठिंबा असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना वडेट्टीवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल सरकारवर भादंविच्या कलम 302 अंतर्गत खुनाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी करीत होते. आता ते सत्तेत आहेत. त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या तर नाही उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांची स्थिती अधिक खालावली आहे. मुख्यमंत्र्यांचे वक्‍तव्य दुर्दैवी असून घर फिरले की, घराचे वासेही फिरतात. त्याचप्रमाणे या सरकारचे डोके फिरले आहे, असा टोमणाही वडेट्टीवार यांनी मारला. 

भाजपचे प्रवक्ता माधव भांडारी यांच्या अकलेचे दिवाळे निघाले असून भाजपच्या नेत्यांना सत्तेचा माज आल्याचे वडेट्टीवार यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात म्हणाले. शेतकऱ्यांच्या संपावर गेल्याने काहीही फरक पडत नाही, असे वक्तव्य भंडारी यांनी केले होते. 
 

संबंधित लेख