Congress Booth Committees will be Strengthened Says Balasaheb Thorat | Sarkarnama

बूथ कमिट्या नसल्याने गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता हुकली : बाळासाहेब थोरात 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनुकुल स्थिती नाही. राजकीय वातावरण त्यांच्या विरोधात आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला त्यांचा पराभव शक्‍य होता. मात्र, केवळ पक्षाच्या बुथ स्तरावर कमिट्या नसल्याने गुजरातमध्ये सरकार स्थापन करण्यात पक्ष कमी पडला - बाळासाहेब थोरात

नाशिक : गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनुकुल स्थिती नाही. राजकीय वातावरण त्यांच्या विरोधात आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला त्यांचा पराभव शक्‍य होता. मात्र, केवळ पक्षाच्या बुथ स्तरावर कमिट्या नसल्याने गुजरातमध्ये सरकार स्थापन करण्यात पक्ष कमी पडला. आता ही उणीव भरुन काढणार असून देशभर पक्षाध्यक्ष राहूल गांधींशी संपर्काची व्यवस्था केली जात आहे, अशी माहिती आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली. 

आमदार थोरात अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे सदस्य झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नाशिक मध्य मतदारसंघात पक्षाच्या शक्ती अॅप चे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले, ''नोटाबंदीसाठी भाजप सरकारने अनेक कारणे दिली होती. त्यातील एकही कारण सिद्ध होऊ शकले नाही. उलट देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन सामान्य नागरिक अडचणीत आहे. सामान्यांना चार हजार रुपये बदलण्यासाठी रांगेत उभे राहावे लागले. धनाढ्यांना मात्र नोटांची बंडले बदलून मिळाली." 

थोरात यांनी पेट्रोल दरवाढ, महागाई, जीएसटी प्रणाली यासंदर्भात सरकारवर टीका केली. ते म्हणाले, "केंद्र व राज्यात अस्थितेचे वातावरण आहे. सत्ता असताना पक्षात येण्यासाठी सगळ्यांचीच गर्दी असते. सत्तेबाहेर असतांना, मात्र वाईट स्थितीत पक्षाला सर्वांनी साथ दिली पाहिजे. तरुणांना आताच काँग्रेसकडे येण्याची संधी आहे." युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणात काँग्रेसच्या संपर्कात येण्याची भावनिक सादही त्यांनी घातली. बूथ कमिट्यांचे कार्य थेट राष्ट्रीय पक्षश्रेष्ठीपर्यंत पोचवावे तसेच सामान्य नागरिक ते वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा संपर्क थेट दिल्लीशी होण्यासाठी उत्तम प्रकारच्या संवादाचे माध्यम म्हणून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या संकल्पनेतून 'शक्ती अॅप' तयार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, गटनेता शाहू खैरे, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, आशा तडवी, नगरसेवक राहुल आहेर, संपत सकाळे, दिगंबर गिते, बबलू खैरे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष हनिफ बशीर आदी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख