देशावर संघविचार लादण्याचा प्रयत्न : मल्लिकार्जुन खरगे

देशावर संघविचार लादण्याचा प्रयत्न : मल्लिकार्जुन खरगे

औरंगाबाद : स्वायत्त संस्था संघ विचाराच्या व्यक्तींकडे सोपवल्या जात आहेत. मोदी हे वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचे असल्याचे भासवण्याचा प्रयत्न होतोय. पण पटेल हे कॉंग्रेस, राज्यघटनेतील विचारांचे पाईक होते आणि भाजपाला देशात सनातन धर्म, गोळवळकर गुरुजी, नथुराम गोडसे, आरएसएसची विचारधारा आणायची आहे. भाजपचे मंत्रीच राज्यघटना बदलण्याची भाषा करत आहेत. मात्र, देशाला महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज असल्याचे मत राज्य प्रभारी व खासदार मल्लीकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले. कॉंग्रेसच्या जनआक्रोश मोर्चाचा समारोप गुरुवारी (ता 1) मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाला. त्यावेळी ते बोलत हत. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांचीही भाषणे झाली. 

कॉंग्रेस संविधानाच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. निवडणुकीपूर्वी मोदींनी काळ्या धनाचे 80 लाख कोटी देशात परत आणून प्रत्येकाला 15 लाख देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, नितीन गडकरी आणि अमित शहा यांनीच हे "चुनावी जुमले' असल्याचे मान्य केल्याची आठवणही श्री खरगे यांनी करुन दिली. 
भाजपने देशवासीयांची फसवणूक केली - गुलाम नबी आजाद 
भाजपासोबत सिद्धांत आणि विचारधारेची लढाई सुरू आहे आणि पुढेही असेल. देशांतील जनतेला फसवुन सत्ता स्थापन केलेल्या भाजपने साडेचार वर्षात एकही आश्‍वासन पुर्ण केलेले नाही. त्याचा राग जनतेमध्ये असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आजाद यांनी व्यक्त केले. सर्वसामान्याचे महागाईने कंबरडे मोडले आहे. शहरे शेतकऱ्यांवर अवलंबुन आहेत. शेतकरी जगला तरच शहरे जगतील. त्यासाठी शहरवासीयांनी शेतकऱ्यांसाठी भांडले पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी औरंगाबाद येथील जनसंघर्ष यात्रेच्या समारोप प्रसंगी केले. 
पुढे बोलतांना श्री. आझाद म्हणाले, देशातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न सुध्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला नाही. मोदी सरकारच्या आश्वासनानुसार आतापर्यंत नऊ कोटी बेरोजगारांना रोजगार मिळायला हवा होता. मात्र केवळ वीस लाख नोकऱ्या मिळाल्या. कॉंग्रेसने दिलेल्या 56 लाख लोकांचा रोजगारही नोटाबंदीने घालवल्याचा आरोप आझाद यांनी केला. 
सरकारने आत्मविश्वास गमावला-  चव्हाण 
भाजप सरकार मध्ये आत्मविश्वास राहिलेला नाही त्यामुळे निवडणुकांचा संभ्रम सुरू आहे. खोटे आश्वासन दाखवल्यामुळे कृषी विकासदर एक टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नाही. दुष्काळात सरकारकडून शब्दच्छल सुरू आहे. राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर राज्यकर्त्यांचे नियंत्रण राहिले नसल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात केला. 

संघर्ष यात्रेमुळेच दुष्काळ जाहीर करावा लागला असा दावा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात केला. जनभावनेपुढे आता सरकार नमत आहे. पण आता वेळ निघून गेली आहे, टंचाई की दुष्काळ हे सरकारने अगोदर ठरवावे. तिजोरीत दमडा शिल्लक ठेवला नाही म्हणून हा शब्दांचा खेळ सुरू आहे. दुष्काळ सदृष्य आणि मंत्री अदृश्‍य अशी परिस्थिती असल्याचेही ते म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com