Cong-NCP spoiling the Farmers Strike | Sarkarnama

'ते' शेतकरी नाहीतच - सदाभाऊ खोत

कपालिनी सिनकर
शुक्रवार, 2 जून 2017

18002330244 हा पणन मंडळाचा टोल फ्री क्रमांक असून ज्या शेतकऱ्याला आपला माल द्यायचा असेल किंवा काही अडचणी येत असतील, तर त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा - सदाभाऊ खोत

मुंबई - 'नाशिकला भाजीपाला आवकीवर परीणाम झाला आहे. पुण्यातही आवक घटली आहे. मुंबईत मात्र, काही परिणाम झालेला नाही. पणन मंडळाकडून 'टोल फ्री' नंबर तयार करण्यात आला आहे. शेतकरी त्याच्यावर संपर्क साधू शकतात.' असे आवाहन करतानाच 'भाजीपाला आणि दुधासह इतर माल अडवून करणारे शेतकरी नाहीत.शेतकऱ्यांच्या मध्ये काही मंडळी घुसली आहेत. ज्यांना 15 वर्ष काही करता आलं नाही ते संप चिघळावत आहेत,' असे वक्तव्य राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज मुंबईत केले आहे. आपल्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, 'सरकारला शेतकऱयांना न्याय द्यायचा आहे. शेतकरी संपाचीदखल घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे निमंत्रण दिल आहे ते स्वीकारावे, असे माझे आवाहन आहे. संवाद, समोपचाराने प्रश्न सोडवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे,' या आवाहानाला शेतकरी प्रतिसाद देतील, असा विश्वासही खोत यांनी यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, 'दंगा, गाड्यांची मोडतोड यांच्याशी शेतकऱ्यांचा संबंध नाही, असे शेतकरी नेते सांगत आहेतगोंधळ, दंगा करण्याचा प्रयत्न काँग्रेस - राष्ट्रवादी करीत आहे.
शेतकऱ्यांचा प्रश्न सुटावा ही माझी इच्छा आहे. संपाची सरकाराने गंभीर दखल घेतली आहे.सनदशीर मार्गाने आंदोलन करताना, ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असतील, त्याबाबत चौकशी केली जाईल.या संपाचा गैरफायदा घेत कुणी चढा भाव, साठेबाजी करत असेल, तर पणन मंडळ त्यांच्यावर कारवाई करेल.'

18002330244 हा पणन मंडळाचा टोल फ्री क्रमांक असून ज्या शेतकऱ्याला आपला माल द्यायचा असेल किंवा काही अडचणी येत असतील, तर त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही खोत यांनी यावेळी केले.

संबंधित लेख