...आणि आमदार यशोमती ठाकूर यांचे शब्द खरे ठरले

...आणि आमदार यशोमती ठाकूर यांचे शब्द खरे ठरले

पुणे : कर्नाटकात आमच्या युतीचे सरकार सत्तेत आल्याशिवाय मी बंगळूरू सोडणार नाही, असा निर्धार आमदार यशोमती ठाकूर यांनी चार दिवसांपूर्वी केला होता. आज चार दिवसांनतर त्यांचा विश्‍वास खरा ठरत आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे जाहीर झाल्यानंतरदेखील आमदार ठाकूर यांनी हा विश्‍वास व्यक्त केला होता ही विशेष बाब. 

कर्नाटकमध्ये गेल्या चार दिवसात घडलेल्या साऱ्या घडामोडींच्या आमदार ठाकूर साक्षीदार आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद व अशोक गेहलोत यांच्यासोबत त्यांनी या साऱ्या घडामोडीत महत्वाची भूमिका पार पाडली. मेघालय निवडणुकीतील त्यांच्या लक्ष्यवेधी कामगिरीनंतर पक्षाने त्यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करून कर्नाटक निवडणुकीची जबाबदारी दिली होती. गेले दोन महिने त्या कर्नाटकातच होत्या. बंगळूरू शहर व जिल्ह्यातील 32 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या 32 पैकी 20 मतदारसंघात यश मिळेल,असा त्यांचा अंदाज होता. 

मात्र तितके यश न मिळाल्याने निवडणूक निकालानंतर त्या काहीशा नाराज होत्या. मात्र जनता दलाशी युती करून आपलीच सत्ता येणार या बाबत त्यांना कमालीचा विश्‍वास होता. येत्या तीन-चार दिवसात जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस-राष्ट्रीय जनता दलाचे सरकार सत्तेत येईल. त्यानंतरच त्या महाराष्ट्रात परत येणार आहेत. त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या 32 मतदारसंघापैकी 15 ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. यापैकी किमान तिघांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्रातून अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांना निवडून आलेल्या आमदार ठाकूर या राहूल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील महत्वाच्या शिलेदार मानल्या जातात. त्यामुळेत त्यांना मेघालय विधानसभा निवडणुकीची जबाबदारी, त्यानंतर लगेचच पक्षाचे राष्ट्रीय सचिवपद व कर्नाटक निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 


 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com