मल्हारराव होळकरांना 'मल्ल्या' म्हटल्याने जितेंद्र आव्हाड अडचणीत; पोलिसांत तक्रार 

जितेंद्र आव्हाडांची मांडणी विकृत आहे. सद्या बदनाम असलेले "मल्ल्या' हे नाव त्यांनी मल्हारराव होळकरांना वापरले आहे. मल्ल्याचा मल्हारराव होळकर झाला, हा कपोलकल्पीत आणि होळकरशाहीला बदनाम करणारा इतिहास ते मांडत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.-विक्रम ढोणे
मल्हारराव होळकरांना 'मल्ल्या' म्हटल्याने जितेंद्र आव्हाड अडचणीत; पोलिसांत तक्रार 

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मराठेशाहीचे सरदार मल्हारराव होळकर यांच्याबद्दल सोशल मिडीयावर लिहीताना "मल्ल्या' असा उल्लेख केल्याने ते वादात सापडले आहेत. त्यांच्याविरोधात सांगली जिल्ह्यातील जत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. 

विजयादशमीच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक व ट्विटरवर एक पोस्ट प्रसिद्ध केली होती. 

त्या पोस्टमधील मजकूर पुढीलप्रमाणे : 
या देशात वाल्याचा वाल्मिकी होतो आणि मल्ल्याचा मल्हारराव होळकर होतो. आम्ही याच तत्वावर विश्‍वास ठेवून एक प्रकल्प हाती घेतला आणि एकेकाळी ओवाळून टाकलेला ठाण्यातला भाग आज ओवाळणी करण्याइतका सुंदर झालाय. कळवा, मुंब्रा भागातील रेतीबंदर हा अनधिकृत बांधकामं, सांडपाणी आणि कचऱ्याने बकाल झालेला विभाग. त्याचा काय आमूलाग्र कायापालट होतो आहे, ते पहा. यापुढे कळवा मुंब्रा भागात राहणाऱ्या लोकांना आपला पत्ता सांगताना गर्व वाटेल. होय ठाण्याची चौपाटी आमच्या भागात आहे! 

या मजकुरासोबत आव्हाडांनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. 

त्यांच्या भागाचा विकास कसा होतोय, याचे वर्णन करणारी ही पोस्ट असलीतरी त्यात मल्हारराव होळकर यांचा उल्लेख झाल्याने ती वादग्रस्त ठरली. मल्ल्याचा मल्हारराव होळकर झाला, हे वेडेवाकडे विधान आव्हाड यांनी केल्याने होळकरांना मानणारे युवक संतप्त झाले. संदीप चोरमले, अक्‍की बर्वे या युवकांनी आव्हाड यांनी विकृत इतिहास लोकांसमोर मांडून मल्हाररावांचा अपमान केल्याची भूमिका सोशल मिडीयावर मांडली. त्यामुळे धनगर समाजातून आव्हाडांना निषेध होवू लागला. राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर आव्हाडांनी सोशल मिडीयातून आपली पोस्ट हटविल्याचे जतमधील सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे. 

महापुरुषांची बदनामी करणे आणि विकृत इतिहास मांडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आव्हाडांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ढोणे व सहकाऱ्यांनी जत पोलिसांकडे केली आहे. आव्हाड यांनी मल्हाराव होळकर आणि महर्षी वाल्मिकी यांची बदनामी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंबंधाने आव्हाडांवर गुन्हा नोंदवायचा की नाही, याचा निर्णय जत पोलिस उद्या घेणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com