Competition for Agitation in Yeola Shivsena | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

येवल्यात दुष्काळासाठी शिवसेनेच्या नेत्यांत लागली स्पर्धा! 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

दुष्काळ जाहीर करण्याचे निकष अजब आहेत. त्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे पुरावे दिले आहेत. अजुन हवे असतील तर आणखी पुरावे देऊ. भयावह दाहकता असताना येवल्याचा दुष्काळी यादीत समावेश होत नाही, याची खंत वाटते नरेंद्र दराडे, आमदार 

येवला : येवला मतदारसंघ माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा. ब्रिटीश काळापासुन सातत्याने दुष्काळात होरपळणारा. मात्र, सतत आवर्षणग्रस्त असलेला येवला राज्य शासनाच्या दुष्काळ सदृष्य यादीतून गायब झाला. त्यामुळे सगळेच पक्ष बाह्या सरसावून आंदोलनात उतरले आहेत. शिवसेनेच्या नेत्यांतही त्यासाठी स्पर्धा सुरु झाली असुन आमदार नरेंद्र दराडेंसह शेकडो कार्यकर्त्यांनी तीन तास ठिय्या आंदोलन केले. 

शिवसेनेचे हे आंदोलन होण्याआधीच वेगळ्याच कारणाने चर्चेत आले. विधानसभेचे संभाव्य उमेदवार संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन जाहीर करण्यात आले. त्याचवेळी दुसरे स्पर्धक व पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी त्याच वेळी 'रास्ता रोको' आंदोलन करणार असल्याचे सांगीतले. यामध्ये शिवसेनेच्या नेते, कार्यकर्त्यांत मात्र कुठे कोणत्या आंदोलनात जावे असा संभ्रम निर्माण झाला. ज्येष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करावा लागला. शेवटी सगळ्यांनी तहसीलदार कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केले. आमदार नरेंद्र दराडेंसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी तीन तास ठिय्या आंदोलन करीत तालुका दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. त्याची तहसीलदार व प्रशासनाने दखल घेत अहवाल पाठविण्याचे आश्‍वासन दिले. 

तालुका दुष्काळी जाहीर करणे, पालखेड कालव्याला दोन आवर्तने सोडण्यासह इतर समस्या शिवसेनेने वारंवार शासनाकडे मांडल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून प्रशासन तोडाला पाने पुसत असल्याचा आरोप करत सरकारच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी तत्काळ त्याची दखल घेतली. तहसीलदार रोहिदास वारूळे यांनी आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध पक्षांनी आंदोलन केले आहे. 

*#सरकारनामा होऊ दे चर्चा!*
राजकारणाची आजची दशा सांगणारा आणि उद्याची दिशा ठरवणारा #सरकारनामा.. प्रत्येकाच्या संग्रही असावा असा राजकीय दस्तावेज!
आजच जवळच्या विक्रेत्याकडं संपर्क साधा.. अंक Amazon.in वरही उपलब्ध आहे..\ #नातंशब्दांशी 

 

 

संबंधित लेख