पार्थ पवार, तुलना तर होणारच..

पार्थ यांनी निवडलेला मावळ मतदारसंघ ग्रामीण आणि निमशहरी आहे. पवारांचा पारंपरिक करिष्मा किंवा पक्षाची एकहाती सत्ता इथे नाही. त्यामुळे लोकांना भावणारे प्रचाराचे मुद्दे, त्यांची आक्रमक मांडणी, घटक पक्षांची मनधरणी करत विरोधी उमेदवारांच्या आवाहनाला पुरून उरावं लागेल.
Rohit Pawar - Parth Pawar
Rohit Pawar - Parth Pawar

०१७ : पुणे जिल्हा परिषदचे निकाल जाहीर झाले. राष्ट्रवादीने गुलाल उधळला. त्यावेळी एक बातमी खूप गाजली. ती म्हणजे 'पवारांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय'. निमित्त होतं रोहित पवार यांचं शिर्सुफळमधून राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचं.

पवारांच्या कुटुंबातून येणारे रोहित पवार हे शरद पवारांचे जेष्ठ बंधू कृषीमहर्षी आप्पासाहेब पवार यांचे नातू आणि सुनंदा-राजेंद्र पवार यांचे चिरंजीव. यानंतर रोहित पवार वारंवार चर्चेत राहिले. कधी त्यांचं सामाजिक काम तर कधी साखर उद्योगात अगदी कमी वयात पॉलिसी कमिटीच्या (ISMA) अध्यक्षपदी नेमणुक. त्यांनी तरुणांसाठी सुरु केलेलं सृजन व्यासपीठ कौशल्य विकास, रोजगार, खेळ आणि कला या सर्वांचा मेळ घालणारं तरुणाईचं आघाडीचं व्यासपीठ ठरत आहे. अलीकडच्या काळात त्यांनी विविध प्रश्नांवर, मुद्द्यांवर समाज माध्यमांमधून मांडलेली भूमिका, मतही सतत चर्चेत असतात. गेल्या दोन वर्षात पवार कुटुंबाचे सदस्य असूनही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यात त्यांना यश येतं आहे, असं म्हणता येईल.

गेले काही दिवस लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा पवारांवर चर्चा सुरू झाली. निमित्त होतं शरद पवारांचे पुतणे आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून थेट लोकसभेची उमेदवारी देण्याचं. आता उमेदवारीची अधिकृत घोषणाही झाली आहे आणि कालच त्यांची जाहीर प्रचार सभाही अनुभवायला मिळालीय. पार्थ यांचं पहिलं भाषण झालं. त्यावेळी 'भावी खासदार' म्हणून कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचंही ऐकायला मिळालं. त्यांच्या भाषणानंतर शरद पवार, अजित पवार, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनी पार्थ कसे नवीन आहेत, शिकतील, त्यांना सांभाळून घ्या वगैरे वारंवार जनतेला पटवून सांगितलं.

पहिली जाहीर सभा आणि तिथलं पहिलं भाषण. तेही आजोबा आणि वडील मंचावर असताना. अशी नामी संधी मिळूनही, पार्थ यांना कौटुंबिक वारसा आळवण्यापलीकडे मराठीतून चार वाक्यही नीट बोलता (वाचता) आलेली नाहीत. मान्य आहे, की पार्थ नवीन आहेत. पण त्यांच्या भाषणात उद्याच्या भावी खासदाराची आश्वासक झलक आज तरी दिसली नाही.

शरद पवार मुत्सद्दी राजकारणी आहेत. राजकारणातल्या जेष्ठ व्यक्तींपासून राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुणाईपर्यंत सर्वांना त्यांचा आदर्श वाटतो. महाराष्ट्राचे राजकीय गणित त्यांच्याशिवाय आकाराला येत नाही. अजित पवार याना राजकारणात आणणारे शरद पवार. अजितदादांचा राजकीय प्रवास जिल्हा बँका-सहकारी संस्था असा सुरु झाला. स्वतःच्या खास गावरान शैलीमुळे ग्रामीण महाराष्ट्रात त्यांना मोठा 'फॅन फाॅलोअर' आहे. त्यानंतर राजकारणात आलेल्या सुप्रिया सुळे. थेट खासदारकीची निवडणूक लढविली असली तरी संघटनाच्या पातळीवर युवतींचे व्यासपीठ त्यांनी उभे केले. तरी थेट दिल्लीचे तख्त गाठणाऱ्या ताईंना जमिनीवरचे कार्यकर्ते आजही बिचकून असतात. २०१७ मध्ये रोहित यांच्या राजकारणाची सूरूवात जिल्हा परिषदेतून झाली. या पार्श्वभूमीवर थेट (तरुण नेतृत्व म्हणून) खासदारकीची संधी मिळविणाऱ्या पार्थ यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असणं यात काहीही वावगं नाही.

पवारांच्या कुटुंबातली तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होतेय (झालीय) एकीकडे रोहित पवार - ज्यांच्याकडे आजोबा आप्पासाहेब आणि आई-वडिलांचा अ-राजकीय सामाजिक वारसा आहे. त्यांचं स्वतःचं व्यावसायिक काम आहे. निवडून आल्यावर अवघ्या दोन वर्षांत स्वतःच उभं करत आणलेलं काम, तरुणांचं संघटन ही त्यांची जमेची बाजू. एकीकडे आजोबा शरद पवारांचा आदर्श सांगत ते स्वतः राज्यभर फिरून संघटनावर भर देताहेत. समाजातल्या प्रतिष्ठितांना जवळ करतांना सर्व सामान्य तरुणालाही बांधून घेताहेत. डिजिटल माध्यमांचा सुयोग्य वापर करून स्वतःची ठाम भूमिका मांडण्यावरही त्यांचा कल दिसतो.

या उलट पार्थ पवार यांनी लोकसभेच्या निमित्ताने काही महिन्यांपूर्वी पक्षाच्या सभांना हजेरी लावायला सुरुवात केली. अवघ्या २८ वर्षे वय असणाऱ्या या तरुण उमेदवाराचा डिजिटल माध्यमांवर अपेक्षित वावर नाही. अजून स्वतःची अशी वैचारिक भूमिका त्यांनी मांडलेली नाही. यापूर्वी पक्षात म्हणाल तर वावर शून्य. इतक्या गदारोळानंतर मिळालेली उमेदवारी, त्याची पहिली सभाही 'ट्रोल' झालीय. त्यामुळे उद्याचं आव्हान खडतर आहे हे निश्चित.

पार्थ यांनी निवडलेला मावळ मतदारसंघ ग्रामीण आणि निमशहरी आहे. पवारांचा पारंपरिक करिष्मा किंवा पक्षाची एकहाती सत्ता इथे नाही. त्यामुळे लोकांना भावणारे प्रचाराचे मुद्दे, त्यांची आक्रमक मांडणी, घटक पक्षांची मनधरणी करत विरोधी उमेदवारांच्या आवाहनाला पुरून उरावं लागेल. या निवडणुकी पुरतंच नाही तर एकूणच राजकारणात त्यांना भाषा आणि भाषण या गुणांना विकसित करत न्यावे लागेल. संघटन बांधावं लागेल. वडिलांची हातोटी वापरून जमिनीवरच्या कार्यकर्त्यांशी स्वतःला जोडून घ्यावं लागेल. माध्यम आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा लागेल.

...नाही तर घराणेशाहीचा ठपका आहेच. विरोधक तो उगाळत राहणार आणि पार्थ यांची तुलना वारंवार रोहित पवार यांच्याशी होणार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com