Combined polls Some Relief some tension to BJP in Pimpri | Sarkarnama

एकत्र निवडणुकीमुळे पिंपरीत भाजपला थोडा खुशी...थोडा गम

उत्तम कुटे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

एक देश, एक निवडणूक घेण्याचा भाजपचा विचार आहे. ते शक्य नसल्याचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मात्र, पुढील वर्षी लोकसभेसह विधानसभाही असलेल्या महाराष्ट्रासह काही राज्यात त्या शक्य आहेत. कारण तेथे फक्त काही महिन्यांचेच अंतर या दोन्ही निवडणुकांत आहे.

पिंपरीः लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका राज्यात एकत्र आणि युतीशिवाय झाल्या, तर पिंपरी-चिंचवडमध्ये लोकसभेला भाजपला थोडा फायदा होईल, अशी तूर्त स्थिती आहे. तर,विधानसभेला विजय मिळवू देणाऱ्या उमेदवारीसाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे. मात्र, युती झाली, शहरातील शिवसेना व भाजपचे बलाबल 'जैसे थे' राहण्याची शक्यता आहे. 

एक देश, एक निवडणूक घेण्याचा भाजपचा विचार आहे. ते शक्य नसल्याचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मात्र, पुढील वर्षी लोकसभेसह विधानसभाही असलेल्या महाराष्ट्रासह काही राज्यात त्या शक्य आहेत. कारण तेथे फक्त काही महिन्यांचेच अंतर या दोन्ही निवडणुकांत आहे. परिणामी या दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या, तर उद्योगनगरीत भाजपची विधानसभेला उमेदवारीसाठी काहीशी कसरत होणार आहे. 

शहराचे प्रतिनिधीत्व करणारे दोन्ही खासदार (शिरूरचे शिवाजीराव आढळरावदादा-पाटील व मावळचे श्रीरंगअप्पा बारणे) हे दोन्ही शिवसेनेचे आहेत. तर शहरातील तीनपैकी दोन आमदार (चिंचवडचे लक्ष्मणभाऊ जगताप व भोसरीचे अपक्ष व भाजपचे सदस्य महेशदादा लांडगे) भाजपचे व एक शिवसेनेचे (पिंपरीचे अॅड. गौतम चाबुकस्वार) आहेत. युती झाली,तर या जागा आहेत, तशा राहतील. तसेच तेथे दुरंगीच लढती (राष्ट्रवादी विरुद्ध युती) होतील. मात्र, युती झाली नाही, तर याच लढती तिरंगी होणार आहेत. 

एकत्र निवडणुक आणि ती युतीअभावी झाली, तर भाजपला निवडून येणाऱ्या उमेदवारांसाठी विधानसभेला भोसरी व चिंचवडला शोधाशोध करावी लागेल. त्याचवेळी तेथे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार मात्र विजयाला गवसणी घालणारे असणार आहेत. भोसरी, चिंचवडमधून विद्यमान आमदार दादा व भाऊ पुन्हा आमदार म्हणून निवडून येणे अवघड नाही. मात्र, लोकसभेत 2019 ला एकहाती सत्ता मिळविण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. हे साडेतीनशे खासदारांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाऊ व दादांना ते लोकसभेला उभे करण्याच्या विचारात आहेत. 

तसे झाले, तर त्यांच्याकडे विधानसभेला भाऊ व दादांएवढा निश्चीत विजय मिळवू शकणारा उमेदवार दिसत नाही. त्यामुळे विधानसभेला सुद्धा आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी लोकसभेचे संभाव्य उमेदवार असलेल्या या दोघांनाच लक्ष घालावे लागणार आहे. त्यातून ते म्हणतील त्याला आमदारकीचे तिकिट भाजपला द्यावे लागेल. त्यातून त्यांच्या एकेका खंद्या समर्थकाची लॉटरी लागणार आहे.

दुसरीकडे मतदारसंघातील बदललेली राजकीय समीकरणे आणि ताकद पाहता युती झाली नाही,तर मावळमध्ये लोकसभेला भाजप बाजी मारेल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. तर, शिरूरमध्येही काट्याची टक्कर होईल, असे त्यांचे मत आहे. विधानसभेला, मात्र युतीअभावी तसेच भाजपकडे तूर्त बलदंड उमेदवार दिसत नसल्याने दोघांच्या भांडणात राष्ट्रवादीचा लाभ होण्याची शक्यता आहे. एकूणच सध्या जर..तर च्या या वातावरणामुळे उद्योगनगरीतील राजकीय चित्र पूर्ण स्पष्ट झालेले नाही. मात्र, शहराचा निवडणुकीचा इतिहास पाहता लोकसभेच्या उलट निकाल विधानसभेला देण्याची परंपरा कायम राहते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख