codeword for gauri lankesh residence | Sarkarnama

गौरी लंकेशच्या घराचा कोडवर्ड होता 'गोशाळा'! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

गौरी लंकेशच्या मारेकऱ्यांनी एकाच दिवसात चौघा विचारवंतांची हत्या करण्याचा कट रचल्याची माहिती पुराव्यासह स्पष्ट झाली आहे. लंकेश यांच्या हत्येचा मास्टर माइंड अमोल काळे याच्या डायरीतच तसा स्पष्ट उल्लेख आढळला असून, त्यांच्या हिटलिस्टवर 36 जण होते. 

बंगळूर : गौरी लंकेशच्या मारेकऱ्यांनी एकाच दिवसात चौघा विचारवंतांची हत्या करण्याचा कट रचल्याची माहिती पुराव्यासह स्पष्ट झाली आहे. लंकेश यांच्या हत्येचा मास्टर माइंड अमोल काळे याच्या डायरीतच तसा स्पष्ट उल्लेख आढळला असून, त्यांच्या हिटलिस्टवर 36 जण होते. 

"एकही दिन चार अधर्मियोंका विनाश' (एकाच दिवसात चार अधर्मियांचा विनाश) असे काळेच्या डायरीत लिहिले आहे. त्यासाठीची योजना आखण्यात येत होती; परंतु डायरी पोलिसांच्या हाती लागल्याने संशयित सावध झाले. डायरीत हत्येच्या दिवसाचा उल्लेख नाही. विचारवंतांच्या हत्येची माहिती मिळाल्यानंतरच चौघाही विचारवंतांना एसआयटी अधिकाऱ्यांनी अधिक संरक्षण दिले होते. 

लंकेश यांच्या हत्येनंतर साहित्यिक गिरीश कर्नाड, निडूमामीडी मठाचे वीरभद्र चन्नमल्ल स्वामी, प्रा. के. एस. भगवान व नरेंद्र नायक या चौघांची एकाच दिवशी हत्या करण्याचा कट होता. त्यांच्या नावासमोर कोडवर्ड लिहिले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. चौघाही विचारवंतांच्या शूटर्सची नावे अमोल काळे यांने कोडवर्डमध्ये लिहिली होती. गौरी लंकेश यांची हत्या केलेला परशुराम वाघमारे याच्यावर नरेंद्र नायक यांची हत्या करण्याची जबाबदारी सोपविली होती, असे डायरीवरून दिसून येते. काळे याच्या डायरीत वाघमारे याला बिल्डर असा कोडवर्ड आहे. गिरीश कर्नाड यांना "काका', निडूमामीडी स्वामींना "स्वामी' असे कोडवर्ड होते. गौरी लंकेशला "अम्मा' व त्यांच्या घराला "गोशाळा' अशी टोपण नावे होती. डायरीत मराठी व इंग्रजी भाषेत लिहिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत डायरीत काळे याचे हस्ताक्षर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मारेकऱ्यांच्या यादीत 36 जणांची नावे होती. 

संबंधित लेख