CM Trophy cricket matches | Sarkarnama

सीएम चषकाची जबाबदारी म्हणजे विधानसभेचे बाशिंग ?

अरूण जैन
बुधवार, 5 डिसेंबर 2018

आमदार नसलेल्या ठिकाणी ज्यांना जबाबदारी दिली आहे त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीची संधी असल्याचे मानले जात आहे.

बुलडाणा : सीएम चषकाच्या नावाखाली भाजपाने महाराष्ट्रभर स्पर्धांचा धडाका लावला आहे. युवकांचे मनोरंजन, खेळाला प्रोत्साहन आणि पक्षसंघटनेला संधी असे एका दगडात अनेक पक्षी (पक्ष) मारण्याची भाजपची खेळी दिसते.

 मात्र आमदार नसलेल्या ठिकाणी ज्यांना जबाबदारी दिली आहे त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीची संधी असल्याचे मानले जात आहे.

बुलडाणा जिल्ह्यात घाटाखालील मलकापूर, जळगाव जामोद आणि खामगावमध्ये अनुक्रमे चैनसुख संचेती, डाॅ. संजय कुटे व आकाश फुंडकर हे भाजपचे आमदार आहेत. त्यांच्याकडे सीएम चषकाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

घाटावर मात्र बुलडाण्यात योगेंद्र गोडे, चिखलीत श्वेता महाले, सिंदखेडराजात विनोद वाघ व मेहकरमध्ये प्रकाश गवई यांच्याकडे पक्षाने या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी दिलेली आहे. सर्वजण भरपूर मेहनत घेऊन कामही करीत आहे. पक्षाने राज्यभर हाच पॅटर्न राबविलेला दिसतो. या चषकाला प्रतिसादही चांगला मिळत आहे. 

भाजपला या निमित्ताने राज्यभर चमकत राहण्याची संधी आहे. मात्र या चषकाच्या निमित्ताने ज्यांना जबाबदारी दिली आहे त्यांना स्पर्धा यशस्वी करण्यासोबतच आपली 2019 च्या विधानसभेतील दावेदारी पक्की करण्यासाठीही सतर्क राहावे लागणार आहे.

बुलडाणा जिल्ह्याचा विचार करता विद्यमान आमदारांची 2019 ची उमेदवारी नक्कीच आहे. मात्र बुलडाण्यात गोडे, चिखलीत महाले, सिंदखेडराजात वाघ व मेहकरात गवई यांना भाजपच्या टीम विधानसभेत प्रवेश मिळविण्यासाठी सीएम चषकाची पटकावून संघातील स्थानही कायम ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

संबंधित लेख