हॅलिपॅडवर मुख्यमंत्र्यांसमोर आत्महत्या करू, भाजप कायकर्ते बडेंचा इशारा 

हॅलिपॅडवर मुख्यमंत्र्यांसमोर आत्महत्या करू, भाजप कायकर्ते बडेंचा इशारा 

नगर ः माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्या गौरव सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी येऊ नये, यासाठी भाजपच्याच काही कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री आल्याचे श्रेय राष्ट्रवादीलाच मिळणार असल्याने विरोध असल्याचे समजते. 

भाजपचे कार्यकर्ते असलेले येळी गावचे सरपंच संजय बडे यांनी तर हॅलिपॅडवर मुख्यमंत्री उतरताच आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. त्यात विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनीही काळे झेंडे दाखविण्याची तयारी केल्याने मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या (ता.25 ) कार्यक्रमास उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

याबरोबरच जिल्हा प्रशासनाकडे मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौऱ्याचे नियोजनच अद्यापही आले नसल्याचे समजते. त्यामुळे मुख्यमंत्री येणारच नाहीत, असाच सूर निघू लागला आहे. मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्यांचा संबंधित जिल्ह्यात दौरा असेल, तर जिल्हा माहिती अधिकाऱ्यांमार्फत दोन दिवस आधी दौऱ्याबाबत प्रसिद्धी पत्रक काढले जाते. मात्र काही तासच बाकी राहिले असतानाही अद्याप दौऱ्याचे नियोजन आले नसल्याने या शक्‍यतेला पुष्टी मिळत आहे. 

ढाकणे यांचा पाथर्डीत होणाऱ्या गौरव सोहळ्यास राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री फडणवीस येणार असल्याने पाथर्डीत जोरदार नियोजन केले आहे. ढाकणे यांचे पूत्र राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ऍड. प्रताप ढाकणे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. ते आगामी लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्‍यता आहे. 

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यक्रमाला आले, तर त्याचा फायदा ढाकणे यांना म्हणजेच राष्ट्रवादीला होईल, अशी शक्‍यता निर्माण झाल्याने भाजपचे कार्यकर्ते खडबडून जागे झाले. मुख्यमंत्र्यांनी येऊच नये, यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. 

बडे यांचा आत्महत्येचाच इशारा 
भाजपमध्ये पाथर्डीत तीन गट आहेत. त्यातील एका गटातील नेत्यांची नावे ढाकणे यांनी पत्रिकेत छापलीच नाही. त्यात खासदार दिलीप गांधी व माजी आमदार दगडू बडे यांचा समावेश आहे. त्यामुळे हा गट नाराज असणे स्वाभाविकच आहे. त्यात भाजपचा कार्यकर्ता संजय बडे यांनी तर मुख्यमंत्री आल्यास आत्महत्येचाच इशारा दिला आहे. तसे निवेदन संबंधित सर्व यंत्रणांना दिले आहे. 

बडे यांनी मागील पराजयाचा वचपा काढण्याचे नियोजन केले दिसते. मागील निवडणुकीत संजय बडे यांच्या विरोधात ऍड. प्रतापराव ढाकणे यांच्या पत्नी प्रभावती ढाकणे उभ्या होत्या. त्यात बडे यांचा पराभव झाला. त्यामुळे ही संधी साधून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पाथर्डीत या कार्यक्रमास येणास विरोध केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तसेच पंकजा मुंडे, प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 


 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com