cm public meeting for nagar corporation election | Sarkarnama

तारीख, वेळ न ठरलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे नगरकरांचे डोळे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

अखेरच्या सभेत मुख्यमंत्री कोणती जादुची कांडी फिरविणार?

नगर : महानगरपालिका निवडणुकीच्या भाजपच्या प्रचाराचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने होणार आहे. तारीख, वेळ लवकरच ठरणार आहे. 

भाजपने ही निवडणूक अत्यंत गांभिर्याने घेतली असल्याचे राम शिंदे यांनी सांगितले होते. त्याप्रमाणेच भाजपचे नियोजन सुरू आहे. सर्वच मंत्री स्मार्ट सिटीचे स्वप्न नगरकरांना दाखवित आहेत. आता मुख्यमंत्री कोणते आश्वासन देऊन नगरच्या झोळीत काय टाकणार, अखेरच्या सभेत मुख्यमंत्री कोणती जादुची कांडी फिरविणार, याबाबत भाजप उमेदवारांनाही उत्सुकता आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार प्रचारासाठी तुटून पडले आहेत. भाजपने फ्लेक्स, सभा, डिजिटल वाहने, प्रचाररथ फिरवून धमाका उडवून दिला आहे, तर त्या तुलनेत विरोधकांनी मात्र मोठ्या सभा घेण्याऐवजी घरोघरी भेट देवून प्रचार करण्यावर भर दिला आहे. 

भाजपने प्रचाराचा नारळ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते फोडला. त्यांनी आपल्या हाताला कसा गुण आहे, हे जाहीर सभेत सांगून फोडलेले नारळ वाया जात नसल्याचे पटवून दिले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही महिलांना आकृष्ठ करण्याचा प्रयत्न केला. महिलांसाठी आश्वासने देवून स्मार्ट गृहिणी बनण्याचा सल्ला दिला. काल सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनीही विरोधकांचा समाचार घेत नगरला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

संबंधित लेख