C.M. opposed Narayan Rane"s entry in BJP | Sarkarnama

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला मुख्यमंत्र्यांचा खो ? 

महेश पांचाळ : सरकारनामा न्यूज ब्युरो 
सोमवार, 10 एप्रिल 2017

नारायण राणे यांच्यासारखा मातब्बर नेता भाजपामध्ये आल्यास शिवसेनेच्या विरोधात आयती तोफ मिळेल. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाचा तसेच सामान्यांच्या प्रश्‍नांची जाण असल्याने भाजपाला त्याचा फायदा झाला असता, असे अमित शाह यांना पटवून देण्यात नितीन गडकरी यांनी यशस्वी झाले होते.

मुंबई : कॉंग्रेसचे आमदार नारायण राणे यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राष्ट्रीय पक्षाध्यक्ष अमित शाह हे अनुकूल होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याने अमित शाह यांनीही, माजी मुख्यमंत्री राहिलेल्या राणे यांना प्रवेश देण्याबाबत फारसा रस घेतला नसल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील राणे यांच्या इंजिनिअरींग कॉलेजच्या प्रांगणात आज 10 एप्रिल रोजी राणे यांच्या 65 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून नारायण राणे हे भाजपामध्ये प्रवेश करणार अशा बातम्या या आधी आल्या होत्या. मोठे नेते मंडळीं उपस्थित राहणार असल्याने हॅलिपॅडची व्यवस्था करण्याचे कामही स्थानिक पातळीवर केले जात होते. मात्र, अचानक राणे यांनी दिल्ली येथे जाउन राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर, कॉंग्रेस पक्षांचे काम करत राहणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी, राणे यांच्या सारख्या मातब्बर नेत्याला भाजपामधून कोणी विरोध केला, याबाबतची उत्सुकता होती. 

केद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नारायण राणे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. पक्षांच्या मर्यादा असतानाही दोन्ही नेत्यांनी उघडपणे मैत्रीचे संबंध लपवून ठेवले नाहीत. नारायण राणे यांच्यासारखा मातब्बर नेता भाजपामध्ये आल्यास शिवसेनेच्या विरोधात आयती तोफ मिळेल. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाचा तसेच सामान्यांच्या प्रश्‍नांची जाण असल्याने भाजपाला त्याचा फायदा झाला असता, असे अमित शाह यांना पटवून देण्यात नितीन गडकरी यांनी यशस्वी झाले होते. अमित शाह यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असता, फडणवीस यांच्याकडून राणे यांच्या भाजपा प्रवेशाला खो होता, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

राणे यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात घ्यावे लागेल. रिकामे ठेवल्यास पक्षांच्या धोरणाविरोधात टिका करण्यास ते मागे पुढे पहाणार नाहीत. कॉंग्रेस आघाडी सरकारमध्ये मंत्री असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात राणे यांनी आगपाखड केली होती. तसेच राणे यांना पक्षवाढीपेक्षा दोन मुलांच्या राजकीय भविष्याची चिंता असते, असा नाराजीचा सूर अमित शाह यांच्यापर्यंत गेल्याने त्यांनीही राणे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत अधिक उत्सुकता दाखवली नसल्याचे समजते. 

संबंधित लेख