आता 'सीएम'च पिंपरीचे 'दादा'

पालिका निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार हे साडेतीन महिने पिंपरीत आलेच नव्हते. त्यानंतर दादांनी मेळावा घेतला. मात्र, त्यात दादांचा पूर्वीसारखा जोश दिसून आला नव्हता. त्यातुलनेत विरोधी बाकावर असतानाही आक्रमकच असलेले फडणवीस हे सत्तेत आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरही तसेच राहिले आहेत. त्यांचा जोश शहरात प्रथमच झालेल्या भाजपच्या प्रदेश मेळाव्यात दिसला होता.
आता 'सीएम'च पिंपरीचे 'दादा'

पिंपरीः  राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू असतानाही वेळात वेळ काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी (ता.13) पिंपरी-चिंचवडच्या खास दौऱ्यावर येत आहेत. त्यातून त्यांचे राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला व बारामतीनंतर आवडीच्या असलेल्या पिंपरी-चिंचवडवर विशेष लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

दादांचा हा बालेकिल्ला फेब्रुवारीमध्ये पुण्यासह जमीनदोस्त केल्यानंतर फडणवीस हे प्रथमच उद्योगनगरीत येत असल्याने ते काय बोलतात याकडे सर्व शहरवासीयांचे आतापासूनच लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, विविध विकासकामांची उद्‌घाटने आणि भुमीपूजनांसाठी मुख्यमंत्री हे पिंपरीला असेच अधूनमधून भेट देणार असल्याचे भाजप वर्तुळातून सांगण्यात आल्याने शहराचे नवे दादा आता अजित पवार यांच्याऐवजी फडणवीस हे होणार असल्यालाही दुजोरा मिळाला आहे.

पालिका निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार हे साडेतीन महिने पिंपरीत आलेच नव्हते. त्यानंतर दादांनी मेळावा घेतला. मात्र, त्यात दादांचा पूर्वीसारखा जोश दिसून आला नव्हता. त्यातुलनेत विरोधी बाकावर असतानाही आक्रमकच असलेले फडणवीस हे सत्तेत आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरही तसेच राहिले आहेत. त्यांचा जोश शहरात प्रथमच झालेल्या भाजपच्या प्रदेश मेळाव्यात दिसला होता. त्यानंतर खास दौऱ्यावर ते येत आहेत. दादांच्या पूर्वीच्या बालेकिल्यात ते दादांवर वा पालिकेतील त्यांच्या राजवटीतील भ्रष्टाचारावर काय बोलतात, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. त्याजोडीने ज्वलंत आणि गंभीर अशा शास्तीकर आणि अनधिकृत बांधकामासह शहराच्या इतर प्रलंबित प्रश्‍नी ते चर्चा करणार आहेत.

मात्र, अधिवेशन चालू असल्याने ते याबाबतीत जाहीर घोषणा करण्याची शक्‍यता कमी आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन, पिंपळेनिलख येथील साई चौकात उभारण्यात येणारे ग्रेडसेपरेटर आणि निगडीतील भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटरचे भूमीपूजन मुख्यमंत्री करणार आहेत. शंभर कोटी रुपये खर्च होणारा निगडीतील उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर हा भविष्यात निगडीपर्यंत होणाऱ्या मेट्रोला अडसर ठरणार आहे.त्यामुळे तो रद्द करावा वा त्याच्या आराखड्यात बदल करावा, अशी मागणी भाजपचे शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडेच केलेली आहे. त्याविषयी ते काय भूमिका मांडणार याची पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com