CM fadnvis snubs MP Sanjay Raut | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

शिवसेनेतील काही नेते उद्धव ठाकरेंपेक्षा स्वतःला मोठे समजतात : मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना टोला 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

भाजपवर रोज जहरी टीका करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी टोला लगावला. काही नेते हे उद्धव ठाकरेंपेक्षा स्वतःला मोठे समजत असल्याची टीका केली. `सामना`मी काही वाचत नाही आणि त्याने केलेल्या टिकेचा सरकार चालविण्यावर काही परिणाम होत नाही, असेही त्यांनी सांगितले.

पुणे : ""शिवसेनेतील काही नेते हे उद्धव ठाकरेंपेक्षा स्वतःला मोठे समजतात. अशा नेत्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही. "सामना'त प्रसिद्ध होणारी मते गंभीरतेनेही घेण्याची गरज नाही,'' असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला. 

मुख्यमंत्र्यांनी एका मुलाखतीत राऊत यांचे नाव घेतले नाही. पण सूचकपणे त्यांच्याकडे इशारा केला. "सामना'तून भाजप सरकारवर रोज टीका केलेली असते, त्याचे काय, या प्रश्‍नावर ते म्हणाले की "सामना' वाचतच नाही. "सामना'त काय प्रसिद्ध होते, त्याचा मंत्रिमंडळातील निर्णयावर काही परिणाम होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात "सामना' किती लोक वाचतात, हे दिल्लीतील पत्रकारांना माहीत नाही. या पत्रकारांना अभ्यास करायला नको. फिल्डवर जायला नको. ते सकाळी "सामना' वाचतात आणि त्या आधारे बातमी करतात. खरे तर त्यातील मजकुराला गंभीरतेने घेण्याची गरज नसते,'' अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. 

तुम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यापैकी कोणाला प्राधान्य देणार, या प्रश्‍नावर ते म्हणाले की स्वाभाविकपणे शिवसेना. ""शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही आधीच्या युतीच्या सरकारचे काही निर्णय पटत नव्हते. ते त्याबाबत जाहीरपणे विचारायचे. मात्र ते सरकारवर सातत्याने टीका करत नव्हते. उद्धव ठाकरेही तसे सहसा करत नाहीत. मात्र शिवसेनेतील काही नेत्यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठे असल्याचे वाटत आहेत. त्यामुळे ते भाजपवर प्रत्येक निर्णयाबाबत कटू टीका करत आहेत. विरोधक आणि सत्ताधारी अशी दोन्ही भूमिका शिवसेना बजावत आहे. अशी दुटप्पी भूमिका शिवसेनेने बजावणे हे जनतेला रूचत नाही. याचा फटका सेनेलाच सहन करावा लागत आहे,''असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

शरद पवार हे दिलदार विरोधक असल्याच्या आपल्या वक्तव्याबद्दल ते म्हणाले की त्यांच्यावर आम्ही या आधी टीका करतो. ते आमच्यावर टीका करतात. मात्र पवार साहेब राज्याच्या विकासकामांबाबत नेहमीच सकारात्मक असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करणे चुकीचे नसल्याचे त्यांनी नमूद केले. शिवसेनेला सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचे कसलेही "डिल' झाले नसल्याचा खुलासा त्यांनी स्पष्ट शब्दांत केला. 

संबंधित लेख