CM Fadnvis orders enquiry in PMC`s medicle purches | Sarkarnama

पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाला मुख्यमंत्र्यांचे "इंजेक्शन' 

यशपाल सोनकांबळे
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

बाजारभावापेक्षा जादा दराने औषधखरेदी, सोनोग्राफी मशिन खरेदीची चौकशी, कमला नेहरू रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, प्रयोगशाळा सुरू करणे आणि उपसंचालक दर्जाचा अधिकारी आरोग्यप्रमुखपदी नेमणे आदी विषयांवर मंगळवारी विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आली.

पुणे : पुणे महापालिकेच्या सर्वात आजारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोग्य विभागाला स्वतः: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच "इंजेक्‍शन' दिले आहे. जादा दराने केलेल्या औषध खरेदीची तत्काळ चौकशी करण्यात येईल तसेच येत्या पंधरा दिवसांत महापालिका आरोग्यप्रमुख नेमला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी एक जुलै रोजी विधानसभेत दिले.'' 

बाजारभावापेक्षा जादा दराने औषधखरेदी, सोनोग्राफी मशिन खरेदीची चौकशी, कमला नेहरू रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, प्रयोगशाळा सुरू करणे आणि उपसंचालक दर्जाचा अधिकारी आरोग्यप्रमुखपदी नेमणे आदी विषयांवर मंगळवारी विधानसभेत लक्षवेधी झाली.

आमदार विजय काळे यांनी ही लक्षवेधी मांडली होती. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर पुण्यातील आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर स्वतः: मुख्यमंत्र्यांना लक्ष घालून या प्रश्‍नाला उत्तर द्यावे लागले. आरोग्य विभागातील विविध अडचणी तातडीने सोडविण्याचे त्यांनी आश्‍वासन दिलेच पण गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले. या विविध विषयांवरील लक्षवेधी मंगळवारी विधानसभेत उपस्थित करण्यात आली. 

यावेळी आमदार काळे म्हणाले, ""पुणे महापालिकेकडून जादा दराने जेनेरिक आणि ब्रॅन्डेड औषधखरेदी करण्यात आली आहे. बाजारभावापेक्षा जादा दराने ही औषध खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीवर आक्षेप घेत आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे तक्रार केली होती. यावर स्थायी समितीने पूर्वीच्या औषध खरेदीला रद्द करत नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु पूर्वीच्या औषधखरेदीची उच्चस्तरीय चौकशी राज्यसरकारने करावी. सोनोग्राफी मशिनच्या नियम डावलून लाखो रुपयांच्या खरेदीची देखील चौकशी करावी. तसेच कमला नेहरू रुग्णालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेतील अतिदक्षता विभाग आणि प्रयोगशाळा (कॅथलॅब) सुरू करण्याचे आदेश राज्यसरकारने द्यावेत.``

आमदार मेधा कुलकर्णी यांनी, पुणे महापालिकेतील आरोग्यप्रमुख पद न्यायालयीन प्रक्रियेचे कारण देत रिक्त ठेवले जात आहे. या पदावर राज्यशासनाने उपसंचालक दर्जाचा अधिकारी पूर्णवेळ अधिकारी म्हणून नेमावा. तसेच "एमबीबीएस' दर्जाच्या डॉक्‍टरांना कचरा कंटेनर उचलण्याची कामे लावली जात आहे, ही बाब योग्य नाही. 

आमदार माधुरी मिसाळ यांनी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रिक्त पदांची भरती सुरू करावी, तसेच कमला नेहरू रुग्णालयातील अतिदक्षता विभाग सुरू करावे. महापालिकेच्या आणि राज्यसरकारच्या आरोग्य सेवा योजना एकत्र करण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली तयार करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली. 

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "महापालिकेकडून जादा दराने पूर्वी जी औषध खरेदी केली गेली त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. नव्वद टक्के जेनेरिक औषधे तसेच दहा टक्के ब्रॅन्डेड औषध खरेदी करण्याचे राज्यसरकारच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश दिले जातील.

केंद्र सरकारच्या सहयोगाने जेनेरिक औषध विक्री केंद्र उभारण्यात येईल. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रिक्त पदांची भरती सुरू करून कमला नेहरू रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयू) आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा (कॅथलॅब) सुरू केली जाईल. सोनोग्राफी खरेदी प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार केल्याची तक्रारी सजग नागरी मंचकडून केला गेली होती.

त्यामध्ये निविदा प्रक्रियेद्वारे बाजारभावानुसार केले गेले आहे. सोनोग्राफीसह इलेस्टोग्राफी, संगणक, प्रिंटर आणि अन्य यंत्रसामग्रीसह खरेदी केलेली आहे. यामध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. तसेच महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी उपसंचालक दर्जाचे अधिकारी नेमण्यासाठीचा प्रस्ताव आल्यावर मान्यता दिली जाईल. 

राज्य सरकार आणि महापालिकांच्या आरोग्य योजना एकत्र करून जिल्हाधिकारी यांच्याकडे नियंत्रणाचे अधिकार देण्यासाठीचे स्वतंत्र संगणकीय प्रणाली पुण्यातही सुरू करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.  

संबंधित लेख