दुकानदारी बंद झाल्याने राज ठाकरेंना फ्रस्ट्रेशन : मुख्यमंत्र्यांचा टोला

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टिकेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला असून त्यांना सुपारीबाज, दुकानदारी असलेले नेते म्हणून टीका केली आहे. तसेच राज यांनी आम्हाला शहाणपणा शिकविण्याऐवजी स्वतःच्या पक्षाचे आत्मपरीक्षण करावे, असाही सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
दुकानदारी बंद झाल्याने राज ठाकरेंना फ्रस्ट्रेशन : मुख्यमंत्र्यांचा टोला

पुणे : दुकानदारी बंद झाल्याने राज ठाकरे यांना फ्रस्ट्रेशन आले आहे. आपल्या काकाशी प्रामाणिक राहिले असते तर त्यांना दुसऱ्यांच्या काकाची सुपारी घेण्याची वेळ आली नसती, अशा कठोर शब्दांत मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

त्यांनी `साम`वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत हे मत व्यक्त केले. `साम`चे संपादक निलेश खरे यांनी ही मुलाखत घेतली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या दोन सभांतून भाजप सरकारच्या विरोधात जोरदार टीका केली होती. त्या टिकेला फडणवीस यांनी आक्रमकपणे उत्तर दिले.

फडणवीस म्हणाले,``ज्या वेळेस एखादी गोष्ट आपण समजून न घेता आरोप करण्यासाठी आरोप करतो, तसे राज ठाकरे यांनी केले आहे. एखादी व्यक्ती क्रिकेटपटू खेळातून निवृत्त झाला की तो काॅमेंट्री करतो. त्यासाठी तो मानधन घेतो. आता राज यांनी मानधन घेतले आहे की नाही, हे मला माहीत नाही. पण राज हे सध्या काॅंमेंट्री करणारे झाले आहेत. ते खेळत नाहीत.``

हरिसाल या डिजिटल गावाविषयी राज यांनी नांदेडच्या सभेत आरोप केले होते. हे माॅडेल राज यांच्या लक्षात आले नाही. पण ज्याची सुपारी घेतली ती त्यांना वाजवावी तर लागेल, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

या गावात फोर जी टाॅवर नाही. विद्यार्थ्यांना लॅपटाॅप दिलेले नाहीत, असा आरोप राज यांनी केला होता. या गावांत टाॅवर पोहोचू शकत नाही म्हणूनच ते गाव डिजिटलसाठी निवडले होते. व्हाइट स्पेस टेक्नाॅलाॅजीद्वारे (स्पेक्ट्रममधील उरलेल्या जागेतून) इंटरनेट कनेक्शन दिले आहे. जिथे फायबर नेटवर्क नाही, कनेक्टिव्हीटी नाही, असे गाव डिजिटल केले आहे. तेथे विद्यार्थ्यांना लॅपटाॅप दिल्याचा दावा केलाच नव्हता. तेथे शिक्षकांना लॅपटाॅप दिलेले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज यांनी कालच्या सभेत ज्या मुलाला हरिसालचा माॅडेल उभे केले आहे, त्या मुलानेच आमच्या टिमला गावात काय बदल झाले आहेत, हे सांगितले होते. त्याचाही व्हिडीओ आम्ही लवकरच देणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. त्या मुलाला आम्ही माॅडेल म्हणून घेतलेले नव्हते, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल राज ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यावरून दिसते आहे की त्यांची दुकानदारी बंद झाल्याचे फ्रस्ट्रेशन ते आमच्यावर काढत आहेत. आपल्या काकाशी प्रामाणिक राहिले असते तर दुसऱ्याच्या काकाची सुपारी घेण्याची वेळ आली नसती, असेही फडणवीस यांनी सुनावले.

राज ठाकरे यांच्याबद्दल सुपारी, दुकानदारी असे शब्द का वापरता आणि त्यांनी कोणाची सुपारी घेतली, असे वाटते, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की त्यांनी कोणाची सुपारी घेतली, हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांचा पक्ष मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना असा होता.  ती आता `उनसे` म्हणजे उमेदवार नसलेली झाली आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. 

इतरांना शहाणपणा शिकविण्यापेक्षा आपल्या पक्षाची अशी अवस्था का झाली, याचे आत्मपरीक्षण राज यांनी करावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.  राज यांना आमच्या लेखी काहीही महत्त्व नाही. त्यांनी जेथे सभा घेतल्या तेथे आमचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com