cm fadanvis gives smart answers on pune | Sarkarnama

पुण्याच्या स्मार्टपणावर मुख्यमंत्र्यांची स्मार्ट उत्तरे! 

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 8 मार्च 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळात सरकारची बाजू प्रभावीपणे मांडतात. इतर मंत्र्यांपेक्षा त्यांची उत्तरे अधिक हजरजबाबी असतात. विधान परिषदेत पुण्याच्या प्रश्नावरील चर्चेत त्यांनी आपल्या स्मार्टपणाचा आणखी एकदा प्रत्यय आणून दिला.

पुणे : पुणे शहर कधी स्मार्ट होणार, या प्रश्‍नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतके चतुरपणे उत्तर दिले की विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरांनाही म्हणावे लागले की मुख्यमंत्री स्मार्ट असून, त्यांची उत्तरे स्मार्ट आहेत. 

कॉंग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी पुण्यातील स्मार्ट सिटीच्या योजनेवर प्रश्‍न विचारला होता. या योजनेंतर्गत तब्बल 56 प्रकल्पांची घोषणा झाली. प्रत्यक्षात त्यातील दोनच प्रकल्प मार्गी लागले. सुमारे तीन हजार कोटी रूपयांचे हे प्रकल्प होते. त्यातील 500 कोटीं रूपयांची कामे सुरू झाली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 2019 मध्ये तरी पुणे हे स्मार्ट सिटी होईल का, असा खोचक सवाल त्यांनी केला. 

नगरविकास खाते हे मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी या विषयावर बॅटिंग केली. पुणे शहरात गेल्या वर्षभरात कामे पिछाडीवर पडल्याची कबुली त्यांनी दिली. मात्र या योजनेत पुणे येत्या वर्षभरात देशातील पहिल्या पाच शहरांत येईल, असा विश्‍वास व्यक्त करत सत्ताधाऱ्यांच्या बाजूकडून टाळ्या मिळवल्या. 24 कामांसाठीच्या वर्क ऑर्डर दिल्याचे त्यांनी सांगितले. येत्या जून महिन्यातच यातील बहुतांश कामे सुरू होण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. त्याच्या भूमिपूजनासाठी मी येणार असल्याचे सांगत आणखी टाळ्या त्यांनी घेतल्या. 

यावर कॉंग्रेसचे गटनेने शरद रणपिसे यांनी पुरवणी प्रश्‍न विचारण्याच्या बहाण्याने सत्ताधाऱ्यांवर टीकाटिप्पणी केली. पुण्याचे पालकमंत्री व संसदीय कामकाजमंत्री यांच्याकडे बघत रणपिसेंनी बापट यांना पुण्याचा साधा कचऱ्याचा प्रश्‍न सोडवता आला नाही. त्यांनी आतापर्यंत 50 बैठका घेतल्या पण हा प्रश्‍न काही सुटला नसल्याचे सांगितले. यावर सत्ताधाऱ्यांच्या बाजूने रणपिसे हे पुण्यात फारसे राहत नसल्याने त्यांना वस्तुस्थितीची माहिती नसल्याची टोमणा मारण्यात आला. खुद्द बापट यांनी रणपिसेंच्या वक्तव्यावर बोलण्याचे टाळले. 

मुख्यमंत्र्यांनी रणपिसेंच्या प्रश्‍नाला उत्तर देताना यापुढे कोणत्याच शहरासाठी कचरा डेपोंना जागा देण्यात येणार नसल्याचे सांगितले. पुण्यात एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ही जुनीच उत्तरे असून मुख्यमंत्री हे प्रश्‍नाला बगल देत असल्याची प्रतिक्रिया रणपिसे यांनी त्यावर दिली. रणपिसेंच्या या वक्तव्यावर अर्धे पुणेकर असलेले सभापती रामराजे निंबाळकर यांनाही राहवले नाही. मुख्यमंत्री स्मार्ट आहेत. त्यामुळे पुण्याच्या स्मार्टपणावर ते स्मार्ट उत्तरे देत असल्याचे सांगत पुढील विषय पुकारला.

संबंधित लेख