CM Devendra Fadnvis applies inclusive politics in Pimpri | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

मुख्यमंत्र्यांचे बेरजेचे राजकारण : खाडेंच्या नियुक्तीने पिंपरीतील मुंडे समर्थकांना आनंद 

उत्तम कुटे
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

खाडे यांची यापदी नियुक्ती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात दोन पक्षी मारले.

पिंपरीः दोन कॉंग्रेसच्या भांडणात रखडलेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला अखेर एका तपानंतर आज लोकनियुक्त अध्यक्ष भाजपचे सदाशीव खाडे यांच्या रुपाने मिळाले. खाडे यांची यापदी नियुक्ती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात दोन पक्षी मारले.

दीड वर्षापासून नाराज व असंतुष्ट असलेल्या जुन्या एकनिष्ठ भाजपाई गटाला (मुंडे गट) हे पद देऊन त्यांना शांत केले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीतील संभाव्य धोकाही मुख्यमंत्र्यांनी टाळला.

खाडे यांनी आज पदाची सूत्रे हाती घेतली. भाजपचे राज्यसभा सदस्य अमर साबळे, राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले अॅड. सचिन पटवर्धन, पालिकेचे सभागृहनेते एकनाथ पवार, जुन्या भाजपाई व स्थानिक नगरसेविका व माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्यासह जुने व एकनिष्ठ कार्यकर्त्यांची मोठी गर्दी यावेळी होती.

46 वर्षाच्या इतिहासातील प्राधिकरणाचे ते सहावे लोकनियुक्त अध्यक्ष आहेत. या पदावर बहुतांश काळ सरकारी अधिकारीच (पुणे विभागीय आयुक्त वा पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त) होते. प्राधिकरण स्थापन झाले तेव्हा म्हणजे 1972 ला बी. बी. तालीम हे पहिले अध्यक्ष,तर नामवंत अर्थतज्ज्ञ वि.म. दांडेकर उपाध्यक्ष होते. तर, शेवटचे अध्यक्ष हे बाबासाहेब तापकीर (2001 ते 2004) होते. त्यानंतर राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या भांडणात हे पद अद्यापपर्यंत रिक्त होते. प्राधिकरणाच्या निर्णयांचा तथा कारभाराचा शहराच्या राजकारणावर परिणाम होत असल्याने या निवडीला मोठे महत्व होते.

गेल्यावर्षी झालेल्या पालिका निवडणुकीत भाजप पिंपरीत प्रथमच सत्तेत आली. मात्र, पदवाटपात जुन्या भाजपाईंना वारंवार डावलण्यात आले. त्यामुळे हा गट तेव्हापासून नाराजच नव्हे,तर संतप्तही होता.  शहरावर आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचा फटका भाजपला बसण्याची भीतीही होती. त्यामुळे यापदी स्व. गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेले खाडे यांची नियक्ती करण्याची स्व. मुंडे यांच्या कन्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे शिफारस मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. त्यामुळे असंतुष्ट पक्ष पदाधिकाऱ्यांच्या जोडीने शहरातील ओबीसी समाजही सुखावला गेला आहे. 

खाडे यांच्या नियुक्तीने प्राधिकरणाचे विलीनीकरण करण्यावर आता पडदा पडला आहे. त्यामुळे भाजपचाच शहरातील एक गट नाराज झाला आहे. त्यांना प्राधिकरणाचे पिंपरी पालिकेत विलीनीकरणाची मागणी केली होती. तर, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना सोन्याचे अंडे देणारी ही कोंबडी पीएमआरडीएत विलीन करायची होती. कामगारांना घर देण्यासाठी स्थापन झालेल्या प्राधिकरणाचा हेतू 46 वर्षानंतरही अद्याप साध्य झालेला नाही. आता,तरी तो होणार का याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख