C.M. Demands to extend pulses purchase up to 31 May | Sarkarnama

तूर खरेदीची मुदत  ३१ मे पर्यंत वाढवा : मुख्यमंत्र्यांचे कृषी मंत्र्यांना पात्र 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

शेतकऱ्यांना मिळेल दिलासा 

मुख्यमंत्र्यांनी नाफेडने तूर खरेदी केंद्रे 31 मेपर्यंत सुरू करावीत, अशी मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे केली आहे. ती मागणी कृषिमंत्र्यांनी मान्य केल्यास राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपली तूर विकलेली नाही, त्या शेतकऱ्यांना हमीभावाने तूर विकणे सोपे जाणार आहे. मात्र, याबाबत केंद्र काय भूमिका घेते याकडे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

सोलापूर : राज्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. नाफेडच्या वतीने सुरू करण्यात आलेली तूर खरेदी केंद्रे 22 एप्रिलपासून बंद करण्यात आली आहेत. परंतु शिल्लक राहणारी तूर विचारात घेता ही केंद्रे पुन्हा सुरू करावीत आणि ही खरेदी 31 मेपर्यंत सुरू ठेवावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्याकडे केली आहे.

 यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, पण आता पुन्हा एकदा बुधवारी (ता.3) त्यांनी मंत्र्यांशी हा पत्रव्यवहार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 

खरीप हंगाम 2016-17 मध्ये राज्यात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. उत्पादन जास्त झाल्याने तुरीचे बाजारभाव खूपच कोसळले आहेत. हमीभावापेक्षाही त्याचे दर कमी झाले आहेत. सध्या बाजारात तीन हजार 800 ते चार हजार 200 रुपये प्रतिक्विंटल दराने तुरीची खरेदी सुरू आहे.

 केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात तूर खरेदी केंद्र 22 एप्रिलपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. त्या कालावधीत  ४१ लाख ५० हजार क्विंटल तुरीची  खरेदी करण्यात आली आहे. याशिवाय अजून सुमारे  दहा  लाख क्विंटल  तूर अद्यापही खरेदी केंद्रात पडून आहे.

शासन तूर खरेदी करेल या आशेवर बाजार समित्यांत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी तूर आणली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हमीभावाने सर्व तूर खरेदी करण्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. 

त्यातच तूर उत्पादक क्षेत्रातील शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. हमीभावाने तूर खरेदी करावी, अशी त्यांची मागणी आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने डाळीच्या साठ्यात वाढ करण्यास सांगितले आहे.

जेणेकरून तुरीचे ढासळलेले दर स्थिर राहण्यास मदत होईल, असाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रात केला आहे. राज्यातील तुरीची ही स्थिती पाहता आपण नाफेडला पुन्हा तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे केली आहे. 
 

संबंधित लेख