CM Delhi tour | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

मुख्यमंत्र्यांकडून साउथ ब्लॉकची टेहळणी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 19 मार्च 2017

मुख्यमंत्री गाडीतून उतरून "नॉर्थ ब्लॉक'कडे जायला निघाले असताना एका पत्रकाराने त्यांना "साउथ ब्लॉक'देखील पाहून घेण्याची सूचना केली.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्लीत नुकतेच भेटले. जेटली यांचे कार्यालय "नॉर्थ ब्लॉक'मध्ये आहे. त्याच्यासमोरच "साउथ ब्लॉक' आहे. याच साउथ ब्लॉकमध्ये संरक्षणमंत्र्यांचे कार्यालय आहे. मुख्यमंत्री गाडीतून उतरून "नॉर्थ ब्लॉक'कडे जायला निघाले असताना एका पत्रकाराने त्यांना "साउथ ब्लॉक'देखील पाहून घेण्याची सूचना केली. सीएम हे संरक्षणमंत्री होणार असल्याची मध्यंतरी अफवा होती. त्यामुळे पत्रकाराच्या बोलण्यातील खोच लक्षात आल्याने फडणवीस यांनी "अर्रर्र हे इकडे आहे होय?,' असे उद्‌गार काढले. दिल्लीतील पत्रकारांशी नंतर बोलताना महाराष्ट्रात अजून बरीच कामे बाकी असून आपण 
तेथेच खूष असल्याचे सांगितले. 

लाल दिव्याविना मंत्री; 
नामफलकाशिवाय प्रकल्प!
 

लाल दिव्याच्या गाडीशिवाय मंत्री, अधिकारी याचा विचारही भारतीय जनता करू शकत नाही. मात्र पंजाबचे नवीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी मात्र सूत्रे घेतल्या-घेतल्या "लाल दिव्या'च्या संस्कृतीला चाप लावला आहे. या निर्णयानुसार राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनाच फक्त लाल दिव्याच्या गाड्या वापरता येतील. मंत्र्यांचा लाल दिवा आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरील अंबर दिवा गायब करण्यात आला आहे. अमरिंदरसिंग यांनी हे भलतेच धाडसी पाऊल उचलले आहे. या पेक्षा आणखी धडाकेबाज निर्णय त्यांनी घेतला आहे. तो म्हणजे राज्य सरकारच्या कोणत्याही प्रकल्पाचे उद्‌घाटन किंवा भूमिपूजन करताना मंत्री, आमदार, अधिकारी यांच्या नावाचे फलक नसतील. "हा प्रकल्प जनतेच्या करातून पूर्ण झालेल आहे,' एवढाच उल्लेख या प्रकल्पावर असणार आहे. कॅप्टन, तुम्ही हे काय करत आहात? तुमचं तरी तुम्हाला समजतयं का? एखाद्या नेत्याच्या विकासनिधीतून (खरे तर जनतेच्याच पैशातून; नेत्याच्या खिशातून नव्हे!) शौचालय किंवा मुतारी बांधली तरी त्यावर नाव लागावे यासाठी नेते तळमळत असतात. पंजाबात आता लाल दिवाही नाही, नावाचा उल्लेखही नाही मग नेतेगिरी दाखवायची कुठे? 

शिवसेना पुढे काय करणार? 
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय विधिमंडळाचे कामकाज चालू देणार नाही, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली खरी. चार दिवस शिवसेनेने ताणूनही धरले. मुख्यमंत्र्यांनी मग शिवसेनेच्या नेत्यांसह शिष्टमंडळ दिल्लीला नेले. त्यानंतर सेनेने दोन पावले मागे घेत सरकारचा अर्थसंकल्प मांडू दिला. विरोधी पक्षांना शिवसेनेची ही चाल साहजिक पसंत पडली नाही. "शिवसेनेचा वाघ काय करतोय? शिवसेनेचा वाघ ढोंग करतोय,' अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. सरकार कर्जमाफी करत नाही आणि विरोधक टोमणे थांबवत नाही, अशी शिवसेनेची धोरणात्मक कोंडी झाली आहे. 

शिवेंद्रसिंहराजे समर्थकांचा अनोखा फतवा 
साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस 30 एप्रिलला आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या काही समर्थकांनी अनोखा फतवा काढला आहे. वाढदिवसाच्या फ्लेक्‍सवर शिवेंद्रबाबा, बाबाराजे, बाबामहाराज असे न लिहिता त्याऐवजी शिवेंद्रसिंह महाराज साहेब असे लिहावे, असे सांगण्यात आले आहे. या फतव्याची खासदार उदयनराजे समर्थकांत मात्र मोठी चर्चा आहे. शिवेंद्रसिंहराजेंना कार्यकर्ते कोणी बाबाराजे, कोणी शिवेंद्रबाबा, कोणी बाबा महाराज अशा नावाने ओळखतात. त्यामुळे वाढदिवसाच्या फ्लेक्‍सवर नाव वेगवेगळे येते. आमदार समर्थकांची वाढदिवसाच्या नियोजनासाठी नुकतीच बैठक झाली. या बैठकीत काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी हा मुद्दा मांडला. त्यानुसार शिवेंद्रसिंह महाराज साहेब असे नाव ठरले. 
 

संबंधित लेख