cm on balasaheb desai | Sarkarnama

बाळासाहेब देसाई मुख्यमंत्री झाले असते ! : देवेंद्र फडणवीस 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

"नियतीने न्याय दिला असता तर बाळासाहेब देसाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते. मात्र, हे मर्यादित कालावधीचे पद देण्यापेक्षा नियतीने त्यांना चिरंतन असणारे लोकनेतेपद बहाल केले', असा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देसाई यांच्या कार्याचा गौरव केला. 

पुणे : "नियतीने न्याय दिला असता तर बाळासाहेब देसाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते. मात्र, हे मर्यादित कालावधीचे पद देण्यापेक्षा नियतीने त्यांना चिरंतन असणारे लोकनेतेपद बहाल केले', असा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देसाई यांच्या कार्याचा गौरव केला. 

लोकनेते दिवंगत दौलतराव उर्फ बाळासाहेब श्रीपतराव देसाई यांच्या कार्याचा गौरव करणारा अभिनंदन प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेत मांडला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, बाळासाहेब देसाई यांचा जन्म 10 मार्च 1910 रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यातील मरळी येथे झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमधून पूर्ण केले. अत्यंत खडतर परिस्थितीला तोंड देत त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी मराठा वसतीगृहात राहून राजाराम कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले. 1939 मध्ये पाटण व कराड येथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय करण्यास प्रारंभ केला. देसाई यांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय भाग घेतला होता. तसेच स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी कित्येक स्वातंत्र्य सैनिकांना अनेक प्रकारची मदत केली होती. त्यांनी 1941 पासून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात करुन महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रावर आपल्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटविला. 

आपल्या राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभी बाळासाहेब 12 वर्षे लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे तसेच त्यासाठी करवाढ करणारे ते राज्यातील पहिले अध्यक्ष होते. देसाई 1952, 1957, 1962, 1967, 1972 व 1978 असे सहा वेळा सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते. 
त्यांनी 1956 मध्ये विधानमंडळ कॉंग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद, 1957 ते 1960 सार्वजनिक बांधकाम मंत्री, 1960 ते 1962 शिक्षणमंत्री, 1962 ते 1963 कृषीमंत्री व 1962 ते 1967 गृहमंत्री व कॉंग्रेस पक्षाचे उपनेते म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. त्यांनी जुलै 1977 ते मार्च 1978 या काळात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपदही भूषविले होते. नियतीने न्याय दिला असता तर बाळासाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते. मात्र, हे मर्यादित कालावधीचे पद देण्यापेक्षा नियतीने त्यांना चिरंतन असणारे लोकनेतेपद बहाल केले. 

स्वातंत्र्योत्तर काळात लोकनेते या संबोधनाने गौरवांकित झालेले बाळासाहेब हे महाराष्ट्रातील पहिले प्रमुख नेते आहेत. आधुनिक महाराष्ट्र घडला, उभा राहिला तो अशा काळापलिकडे पाहणाऱ्या धुरिणांच्या कर्तृत्वातून. पाटण तालुक्‍यात शताब्दी स्मारकाच्या उभारणीस प्रारंभ करुन महाराष्ट्र सरकारने त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. गेली कित्येक वर्षे रखडलेल्या स्मारकाचे काम सुरु केले आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये झालेल्या या स्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्यास मी स्वत: उपस्थित होतो. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील 75 ते 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यालाही राज्य सरकारने मान्यता दिली असून हे काम ही लवकरच सुरु करण्यात येईल. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरच्या महत्त्वाच्या कालखंडात बाळासाहेबांनी महत्त्वाची खाती सांभाळली. विधानसभेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. या कालखंडात राज्यात अनेक दिग्गज नेत्यांच्या मांदियाळीत बाळासाहेबांचा स्वतंत्र ठसा आढळतो. ते फर्डे वक्ते होते. त्यांनी अनेक सभा व विधानसभाही गाजवली. "तुमचा कायदा जर गरीबांच्या भाकरीचा प्रश्न सोडवू शकत नसेल तर तो कुचकामाचा आहे' हे बाळासाहेबांचे रोखठोक व सरळसोट तत्त्वज्ञान होते, असे फडणवीस म्हणाले.  

संबंधित लेख