cm and prashant bamb | Sarkarnama

प्रशांत बंब यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांचा तिसऱ्यांदा दौरा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 मार्च 2018

औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच गट्टी जमली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात तरूण तडफदार, अभ्यासू आणि विकासकामांसाठी झपाटलेला प्रसंगी आक्रमक होणार आमदार अशी प्रतिमा निर्माण करण्यात प्रशांत बंब कमालीचे यशस्वी झाल्याचे दिसते. त्यामुळे "बंबने बुलाया और सीएम चले आये' असेच त्यांच्या आजच्या (ता. 4) गंगापूर दौऱ्याचे वर्णन करावे लागेल. 

औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच गट्टी जमली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात तरूण तडफदार, अभ्यासू आणि विकासकामांसाठी झपाटलेला प्रसंगी आक्रमक होणार आमदार अशी प्रतिमा निर्माण करण्यात प्रशांत बंब कमालीचे यशस्वी झाल्याचे दिसते. त्यामुळे "बंबने बुलाया और सीएम चले आये' असेच त्यांच्या आजच्या (ता. 4) गंगापूर दौऱ्याचे वर्णन करावे लागेल. 

प्रशांत बंब यांच्या मतदारसंघातील लासूर स्टेशन या त्यांच्या गावात सीएसआर फंडातून करण्यात आलेल्या जलसंधारण व इतर कामांचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्या हस्ते रविवारी दुपारी होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुक डोळ्या समोर ठेवून प्रशांत बंब यांनी मतदारसंघात विकासकामांच्या उद्‌घाटनांचा धडाका लावला आहे. 

हे करत असतांनाच आपले राजकीय वजन दाखवण्याची संधी देखील ते सोडत नाहीत. याचा प्रत्यय 4 ऑगस्ट 2017 रोजी मतदारसंघातील गवळीशिवरा येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आला होता. तेव्हा मुंबईत विधानसभेचे वादळी अधिवेशन सुरु होते. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, एमएसआरडीसीचे संचालक राधेश्‍याम मोपलवार यांच्या निलंबनाच्या मागणीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. 

अशा प्रसंगी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशांत बंब यांचा आग्रह मोडला नव्हता. अवघ्या तीन तासांचा सुपरफास्ट दौरा करत मुख्यमंत्र्यांनी दोनशे वर्षांची पंपपरा असलेल्या मतदारसंघातील सदगुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारोहाला तेव्हा हजेरी लावली होती. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून या सप्ताहाला आलेल्या लोकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या व त्यांना यायला भाग पाडणाऱ्या आमदार प्रशांत बंब यांची बरीच चर्चा झाली होती. 

ऑगस्टमध्ये येऊन गेल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा जानेवारी 2018 मध्ये गंगापूरात आले होते. निमित्त होते 18 जानेवारी प्रशांत बंब यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित भव्य आरोग्य शिबीराचे. मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 

 दीड तासांचा धावता दौरा 
ऑगस्ट 2017, जानेवारी 2018 आणि आता चार मार्च रोजी पुन्हा मुख्यमंत्री आमदार प्रशांत बंब यांच्या निमंत्रणावरून गंगापूरात येत आहेत. मतदारसंघातील 108 गावांमध्ये प्रशांत बंब यांनी 262 कोटी रूपयांच्या सीएसआर फंडातून जलसंधारण व इतर कामे हाती घेतली आहेत. काही कामे पुर्ण झाली आहेत तर काही सुरू आहेत. या कामांचे उदघाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. 

विशेष म्हणजे यासाठी अवघ्या दीड तासांचा झटपट दौरा मुख्यमंत्र्यांनी काढला. यावरून मुख्यमंत्र्यांचे बंब प्रेम पुन्हा एकदा दिसून आले आहे. दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी मुख्यमंत्र्यांचे हेलीकॉप्टरने गंगापूर येथे आगमन होणार आहे. उदघाटनाचा कार्यक्रम आटोपून 3 वाजून 35 मिनिटांनी ते मुंबईकडे रवाना होतील. 

विधानसभा, लोकसभेची तयारी 
आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघाची राजकीय समीकरणे गेल्या काही महिन्यात बदलली आहेत. शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यामुळे विधानसभेची जागा राखत भाजपच्या लोकसभा उमेदवाराला देखील गंगापूर मतदारसंघातून मताधिक्‍य मिळवून देण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे बोलले जाते. 

तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या प्रशांत बंब यांना यावेळी शिवसेनेचे कडवे आव्हान असणार आहे. त्यामुळे विजयाची हॅट्रीक साधण्यासाठी बंब झपाटून कामाला लागल्याचे चित्र आहे. त्यातच मतदारसंघात वारंवार मुख्यमंत्र्यांना आणून आपले राजकीय वजन दाखवण्यात देखील बंब बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे दिसून आले. या शिवाय रखडलेल्या राज्य मंत्रीमंडळ विस्तारात देखील प्रशांत बंब यांचे नाव कायम चर्चेत राहिले. 

संबंधित लेख